
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
उद्या रंगपंचमीच्या मुहूर्तावर कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी मढी देवस्थान सज्ज झाले आहे. यावर्षी प्रथमच पुणे येथून आलेल्या भाविकांनी कानिफनाथांच्या मुख्य मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली आहे.
नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथांनी रंगपंचमी च्या दिवशी मढी येथे संजीवन समाधी घेतल्याने होळी, रंगपंचमी व गुढी पाडवा अशा तीन टप्प्यात पार पडत असलेल्या या यात्रेत रंगपंचमीच्या दिवसाला विशेष महत्व आहे. मढी यात्रेची अनेक वैशिष्ठे असून कानिफनाथांनी आपल्या संपूर्ण हयातीत भटक्या समाजातील अडी अडचणी सोडवण्याचे काम केल्याने मढी यात्रेला भटक्यांची पांढरी असे संबोधले जाते. रंगपंचमी च्या दिवशी राज्यासह परराज्यातील भटक्या समाजातील बांधव आवर्जून नाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मढी येथे येतात.
राज्यात जेजुरी नंतर मढी येथेच गाढवांचा बाजार भरत असून रविवारी काठेवाडी व गावरान गाढवे या बाजारात दाखल झाली आहेत. या शिवाय मढी येथील बाजारात शंख, रुद्राक्षाच्या माळा, दुर्मिळ औषधी वनस्पती, गोपीचंद, अष्टगंध भिक्षापात्र, ताईत, नवनाथ ग्रंथ विकणारे विक्रेते सुद्धा मोठ्या प्रमाणात येतात.
मढी येथे पूर्वी विविध समाजाच्या जात पंचायती भरत असायच्या मात्र कायद्याने आता जात पंचायतीला बंदी असल्याने अशा जातपंचायती आता मढी येथे भरत नाहीत. उद्या जिल्ह्याच्या सर्व आगारातून मढी यात्रेसाठी बसेस सोडण्यात आल्या असून दरवर्षी प्रमाणेच या वेळीही एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. या यात्रेत अनेक चोरटे येत असल्याने पोलिसांनी सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.






























































