
सामना प्रतिनिधी, मुंबई
‘दक्षिण- मध्य मुंबईचे शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे हे आपले चांगले मित्र असून आपण महायुतीचा धर्म पाळू’ अशी प्रतिक्रिया आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिली. शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज (रविवार) रामदास आठवले यांची वांद्रे पूर्व येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली.
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा रामदास आठवले यांनी या आधी व्यक्त केली होती, मात्र या मतदारसंघाचे विद्यमान खासदार शेवाळे यांनाच शिवसेनेने पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याने आठवले नाराज असल्याच्या वावडय़ा उठविल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे यांनी घेतलेल्या या सदिच्छा भेटीमुळे सर्व अफवांना अखेर पूर्णविराम मिळाला. रामदास आठवले यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर दोनही नेते प्रसारमाध्यमांना सामोरे गेले.



























































