
सामना ऑनलाईन । मुंबई
पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुस्थानाने आपल्या देशातील पाकिस्तान सुपर लीगचे प्रक्षेपण थांबविले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने त्यांच्या देशात इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे पाकमधील क्रिकेट चाहत्यांची गोची झाली असून, ‘आयपीएल’चे सामने पाहण्यासाठी ते विविध पर्याय शोधत आहेत.
14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40हून अधिक सीआरपीएफ जवान शहीद झाल्याने उभय देशांतील राजकीय संबंध पुन्हा विकोपाला गेले. हिंदुस्थानने पाकिस्तान सुपर लीगचे आपल्या देशातील प्रसारण तडकाफडकी थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान सरकारनेही त्याच्या देशातील आयपीएलचे प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय घेतला.




























































