रस्सेलच्या वादळात हैदराबादचा पाचोळा; कोलकाताचा 6 विकेट, 2 चेंडू राखून विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

सामना दोलायमान हिंदोळय़ावर असताना आंद्रे रस्सेलने खास कॅरेबियन शैलीत फटकेबाजी करीत कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय मिळवून दिला. रस्सेलच्या वादळात गोलंदाजांचा पाचोळा झाल्याने सनरायझर्स हैदराबादला आव्हानात्मक धावसंख्या उभारूनही पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादकडून मिळालेले 182 धावांचे लक्ष्य कोलकाता संघाने 19.4 षटकांत 4 बाद 183 धावा करून पूर्ण केले. शुभम गीलने षटकार ठोकून सामना संपवला. सामनावीर ठरलेल्या आंद्रे रस्सेलने भुवनेश्वर कुमारच्या 19 व्या षटकांत दोन षटकार व दोन चौकारांसह 21 धावांची लयलूट करत सामना कोलकाताकडे झुकविला.

आंद्रे रस्सेलचा कॅरेबियन हिसका

राशीद खानने 47 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह 68 धावा करणाऱ्या नितिश राणाला पायचित करून हैदराबादच्या आशा पल्लवीत केल्या होत्या, मात्र कार्तिकच्या जागेवर आलेल्या आंद्रे रस्सेलने खास आपल्या कॅरेबिनय शैलीत टॉप गेअरमध्ये फलंदाजी करत कोलकाता संघाला विजय मिळवून दिला. त्याने 19 चेंडूंत नाबाद 49 धावांची वादळी खेळी करताना 4 चौकारांसह तितक्याच षटकारांचा घणाघात केला.

राणा-उत्थप्पा जोडीने डाव सारवला

हैदराबादकडून मिळालेल्या 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाइट रायडर्सची सुरुवात खराब झाली. शाकिब अल हसनने दुसऱ्याच षटकात ख्रिस लीनला (7) राशीद खानकरवी झेलबाद करून हैदराबादला सनसनाटी सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर नितिश राणा (68) व रॉबिन उत्थप्पा (35) जोडीने दुसऱ्या गडय़ासाठी 58 चेंडूंत 80 धावांची भागीदारी करीत कोलकाता संघाचा डाव सावरला.