Lok sabha 2019 नांदेड मतदारसंघात 59 उमेदवारांचे अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर वेगवेगळ्या मिरवणूकांनी गजबजून गेला होता. अखेर 59 उमेदवारांनी 94 अर्ज दाखल केले असून, आजच्या तारखेत म्हणजे 26 मार्च रोजी 24 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केले. त्यात युतीचे प्रताप पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे, सपा-बसपा युतीचे अब्दुल समद यांनी मिरवणुकीद्वारे आपले अर्ज दाखल केले.

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज शेवटच्या दिवशी 24 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केले. आज अखेर लोकसभा निवडणुकीसाठी 59 उमेदवारांचे 94 अर्ज दाखल झाले आहेत. 19 मार्च रोजी 1, 20 मार्च रोजी 3, 22 मार्च रोजी 6, 25 मार्च रोजी 25, 26 मार्च रोजी 24 असे 59 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.

महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जुनामोंढा भागातून विशाल रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यात शिवसेना,भाजप, रासपा आणि रिपाइं आठवले गट यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज डॉ.यशपाल भिंगे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह व कार्यकर्त्यांसह मिरवणुकीद्वारे अर्ज दाखल केला. सपा-बसपाचे उमेदवार अब्दुल समद अब्दुल करीम यांनीही जुन्या भागातून प्रचंड मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 29 मार्च रोजी हा आहे. या दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.