
सामना ऑनलाईन । मुंबई
सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्याने अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना आता पाणी, सरबत, ताक आदी पेयांचा आधार घ्यावा लागणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन सरबत, आईस्क्रीम, सोडा, ताक, लस्सी विक्रेते धंदा तेजीत चालण्यासाठी तयारीला लागले आहेत. पण अशा विक्रेत्यांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये यासाठी अन्न व औषध पुरवठा विभाग इनऍक्शन झाला आहे.
उह्याळय़ात उकाडय़ापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेये, विविध फळांचे सरबत, ताक, लस्सी, आईस्क्रीमचा आधार घेतात. बरेच विक्रेते स्वच्छता ठेवत नाहीत. सरबत, ताक, लस्सी व आईस्क्रीम बनविण्यासाठी कुठलेही पाणी, बर्फाचा सर्रास वापर करतात. कमावण्याच्या नादात काही विक्रेते नागरिकांच्या आरोग्याशी खेळतात. खराब पाणी, सरबत वगैरे प्यायल्याने नको ती डोकेदुखी होते. याची गंभीर दखल एफडीएने घेतली आहे. केवळ आपला खिसा भरण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा विक्रेत्यांना एफडीएने रडारवर आणले आहे. शहरात आम्ही धडक मोहीम सुरू केली आहे. आमचे पथक कुठल्याही दुकानात, हॉटेलमध्ये किंवा रस्त्यावर आईस्क्रीम, सरबत, ताक विकणाऱ्या ठिकाणी छापा मारेल. त्या ठिकाणाहून विकल्या जाणाऱ्या पाणी, पदार्थांचे नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेतले जातील. मग त्यात कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) शैलेंद्र आढाव यांनी सांगितले.
…तर सोडणार नाही
नागरिकांच्या आरोग्याची काळजी न घेता हॉटेल अथवा दुकान चालक दूषित पेय विकताना दोषी आढळले तर संबंधितांचा परवाना रद्द केला जाईल, शिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच रस्त्यावर स्टॉल टाकून वाटेल तो सरबत वगैरे विकणारे दोषी आढळले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल, असेही आढाव म्हणाले.
उकाडय़ावर रंगीबेरंगी पंख्यांचा उतारा
अंगातून घामाच्या धारा वाहत असताना अनेक पादचाऱ्यांना रस्त्यांवर रंगीबेरंगी पंखे विकायला उभे राहणाऱ्या विप्रेत्यांकडून एखादा पंखा हातात घेऊन त्याची हवा खाण्याचा मोह झाला नसेल तर नवलच! अनेक लहानग्यांनी हट्टाने आईबाबांकडून हे पंखे मागून घेतले आणि जसा वारा येईल तसा गरागरा फिरणाऱ्या पंख्याकडे कुतूहलाने बघितले.



























































