
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्यात पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या सात लोकसभा मतदारसंघांतील एकूण 184 उमेदवारांपैकी 37 उमेदवारांचे अर्ज छाननीअंती बाद झाले आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 147 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत, तर दुसऱया टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघांत 323 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
11 एप्रिल रोजी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशीम अशा सात मतदारसंघांत निवडणूक होत आहे. या सात मतदारसंघांत 184 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दाखल झालेल्या या अर्जांची आज छाननी करण्यात आली. छाननीत 37 उमेदवार अपात्र ठरले. वर्ध्यात 15, रामटेकमध्ये 21, नागपूरमध्ये 33, भंडारा-गोंदियात 23, गडचिरोलीत 6, चंद्रपूरमध्ये 17 तर यवतमाळ-वाशीममध्ये 31 उमेदवार पात्र ठरले. या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 28 मार्च अशी असून त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान, 18 एप्रिलला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत बुलढाणा येथून 15, अकोल्यातून 16, अमरावतीमधून 37, हिंगोलीतून 45, नांदेडमधून 59, परभणीतून 28, बीडमधून 59, धाराशीवमधून 23, लातूर 15 तर सोलापूरमधून 26 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या दहा मतदारसंघांतील उमेदवारांची संख्या 323 वर गेली आहे.




























































