जमीन सपाटीकरणावेळी सापडला पितळी हंडा, आतून निघाल्या या वस्तू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, आष्टी

आष्टी तालुक्यातील कर्हेवडगाव येथे जेसीबी यंत्राद्वारे जमिनीचे सपाटीकरण करताना झाकणबंद पितळी हंडा सापडला असून हंड्यात देव देवतांची मूर्ती मिळाल्या आहेत.

ashti-guptadhan

तालुक्यातील कर्हेवडगाव येथील शेतकरी गंगाधर उत्तम गायकवाड यांच्या मालकीच्या जमिनीत जमीन सपाटीकरणाचे काम गुरुवारी सुरू होते. काम सुरू असताना जेसीबी यंत्रास हंडा लागला, हे गुप्त धन असल्याचे वाटून गायकवाड यांनी परिसरातील नागरिकांना व आष्टी पोलीस प्रशासनास माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी ते भांडे ताब्यात घेऊन उघडायचा प्रयत्न केला. सापडलेल्या हंड्यावर जर्मन धातूचे झाकण होते. झाकण पक्के लागलेले असल्याने दगडाच्या साहाय्याने ठोकून काढण्यात आले. या मध्ये पितळेचे एक भांडे, देव देवतांच्या मूर्ती, महादेवाची पिंडी, तुळशी माळा, रुद्राक्ष माळ, 2 टाळ, 2 शंख, चिलीम, लाकडी कुंकवाचा करंडा, 21 अंगठ्या असा ऐवज सापडला. या वस्तूंचा पंचनामा करण्यात येऊन नायब तहसिलदार प्रदीप पांडुळे यांनी ताब्यात घेऊन आष्टी येथील कोषागार कार्यालयात सीलबंद करून ठेवण्यात आले आहे.

सापडलेल्या वस्तूंमध्ये किती सोन्याच्या वस्तू किती व पितळी किती याचा अद्याप खुलासा झालेला नाही. पुढील कार्यवाही नायब तहसिलदार पांडुळे करत आहेत. हे गुप्त धन पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.