हैदराबादच्या ‘रन’गाड्याखाली बंगळुरू भुईसफाट, बेअरस्टॉ-वॉर्नर जोडीने झळकवली शतके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादने 231 धावांचा डोंगर उभारल्यानंतर रथी-महारथी फलंदाजांनी सजलेल्या रॉयल चॅलेंजर्स  बंगळुरूचा 118 धावांनी धुव्वा उडवून आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत यंदाच्या मोसमातील सर्वात रुबाबदार विजय मिळवला. जॉनी बेअरस्टॉ व डेव्हिड वॉर्नर या सलामीच्या जोडीची दणकेबाज शतके आणि त्यानंतर मोहम्मद नबी व संदीप शर्मा यांची अफलातून गोलंदाजी ही हैदराबादच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. सामनावीराची माळ 114 धावांची खेळी करणार्‍या जॉनी बेअरस्टॉच्या गळ्यात पडली.

नबीचा डबल धमाका

हैदराबादकडून मिळालेल्या 232 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात अतिशय गचाळ झाली. मोहम्मद नबीने पार्थिव पटेल (11) व शिमरोन हेटमायर (9) या सलामीच्या जोडीला अवघ्या 20 धावांत तंबूत धाडून हैदराबादला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्याने पार्थिवला मनीष पांडेकरवी, तर हेटमायरला यष्टीमागे बेअरस्टॉकरवी झेलबाद केले.

कोहली फ्लॉप

बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली व एबी डिव्हिलीयर्स हे क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम फलंदाज रविवारी फ्लॉप ठरले. संदीप शर्माने कोहलीला (3) वॉर्नरकरवी झेलबाद करून हैदराबादला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर मोहम्मद नबीने आलेल्या एबी डिव्हिलीयर्सचे दांडके उडवून बंगळुरूच्या फलंदाजीतील हवा काढून घेतली.

बेअरस्टॉ-वॉर्नर जोडीचा धमाका

नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला फलंदाजी देऊन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. जॉनी बेअरस्टॉ (114) व डेव्हिड वॉर्नर (नाबाद 100) या सलामीच्या जोडीने बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाला बेदम चोपून काढले. या दोघांनी 98 चेंडूंत 185 धावांची हैदराबादला 185 धावांची धडाकेबाज सलामी दिली. बेअरस्टॉने 56 चेंडूंत 114 तर वॉर्नरने 55 चेंडूंत नाबाद 100 धावांची खेळी केली.