
दिलीप जोशी
आयुष्यात प्रत्येकाला गाणं चारचौघात सादर करण्याइतका ‘गळा’ लाभतोच असं नाही. आमच्या सारख्याला तर ‘घसा’च लाभलेला असतो. काही तर ‘नरडं’ म्हणावं इतकं बेसूर गातात, परंतु तरीही त्यांची गाण्याची ऊर्मी मात्र कमी होत नाही. तेव्हा ‘गळा’ किती ‘गोड’ आहे याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला आपलं गाणं आवडत असेल तर ते जरूर गुणगुणावं. गाणंच आवडत नाही अशी व्यक्ती क्वचितच सापडेल. कारण संगीताची, स्वरसूरांची मोहिनी प्रत्येकावर पडते. हे सूर सभोवतालच्या जीवसृष्टीत आहेत, कोकिळाच्या कंठात आहेत, तसेच वेळूच्या बनातही आहेत. सागराची धीरगंभीर गाज अथवा ओढय़ाचं झुळझुळतं पाणी, प्रपाताचा रौद्ररम्य आवाज या साऱ्या निसर्गलयीच्या विविध छटा. त्यातूनच पुढे ‘बोलणाऱ्या’ माणसाने आपापल्या भाषेत गाणी तयार केली आणि ती तालावर गाण्यासाठी ‘सप्तसुरां’ची रचना झाली. साथीला वाद्यं आली. संगीत एकाचं न राहता समूहाचं झालं. कोकीळकंठी स्वरांची गायक मंडळी मैफली गाजवू लागली. त्याला खूप काळ लोटला. आदिम संस्कृतीतल्या लोकांची वाद्यं आजही जगाच्या अनेक भागात ताल धरतात. नृत्य-गायन, कला माजघरापासून राजमंदिरापर्यंत आणि मंदिरापर्यंतही पोहोचली. ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ असा शब्दनाद घुमू लागला. मराठी शास्त्राrय संगीताच्या क्षेत्रात तर बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांपासून अर्वाचीन काळात अनेक नामवंत गायक उदयाला आले. त्यानंतर नाटय़ संगीत, पुढे चित्रपट संगीत असे कितीतरी भाव प्रगट झाले. भावगीत हा खास मराठीतलाच गान प्रकार. याशिवाय पारंपरिक लोकगीतं, पोवाडे, लावण्या आणि अभंग-ओव्या यांनी समाजमन तृप्त होत होतं. आपल्याकडेच देशातल्या अनेक भागांतल्या संगीताचा साज वेगवेगळा. पंजाबी भांगडा, हिमाचलमध्ये पहाडी धून, गुजरातचा रास गरबा, बंगाली संगीताची विfिशष्ट लय आणि दक्षिणेचं कर्नाटक संगीत असा समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला. त्यातच विविध राजवटींच्या काळात मध्यपूर्वेतील आणि पाश्चात्त्य देशांतील सुरावटींची ओळख आपल्याला झाली. आपलं ‘सारेगमपधनी’ तर त्यांचं ‘डोरेमी-फासोलाटी’. त्यांचंही साऊंड ऑफ म्युझिक मधल्यासारखं क्लासिकल आणि उडत्या चालीचं म्युझिक निराळं. त्यात ब्लूज, जॅझ, रॉक, रॅप अशी भर पडत गेली. जग जसं जवळ आलं तसं विविध देशांतल्या सूर-स्वरांचं आणि वाद्यांचंही आदान प्रदान झालं. पाश्चात्त्य ‘क्लॅरनेट’, ‘ऍकॉर्डियन’ ही वाद्यं आपल्या संगीताचा भाग बनली तर आपली बासरी आणि सतार ही वाद्यं आणि तबल्यासारखी तालवाद्यं जगभर रसिकप्रिय झाली. अमकं संगीत चांगलं आणि तमकं नाही असं सुरांच्या क्षेत्रात काहीच नसतं. मन मोहून टाकणारे सूर-स्वर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून उमटले तरी रसिकांच्या माना आपसूक डोलतात. असं सारं लिहिण्याचं कारण म्हणजे नुकतीच एक बातमी वाचली ती म्हणजे ‘मिलेनिअम्स’ अर्थात एकविसाव्या शतकात जन्माला आलेला पाश्चात्त्य पिढीलाही तिथल्या एकोणीसशे साठच्या दशकातल्या संगीताचा साज आवडतो! कुठेतरी मन सुखावतं… उगीचच! कारण त्या काळातल्या एल्विस प्रिस्लेच्या ‘मार्गारिटा’ गाण्याचे आम्हीही फॅन होतो. बीटल्स आवडत होते. ‘ओसिबिसा, आबा’ हे सांगीतिक ग्रुप ठाऊक होते. ‘बॉनी एम’ नावाने ‘ब्राऊन गर्ल’ आली ती तरुण वयात मनात ठसली. नंतर वाटलं, आम्हाला नाही का पूर्वी सैगल आणि नूरजहाँची गाणी ‘जुनी’ वाटायची. अगदी बालगंधर्वही खूप कळत नव्हतेच. आमच्या मागच्या पिढीकडून त्यांचं कौतुक ऐकताना आमच्या लता-रफी-मन्ना डे-मुकेश-किशोर या काळाशी नकळत तुलना व्हायची. पूर्वीच्या दिग्गजांनी काय स्वरकिमया करून ठेवलीय हे कळायला आम्हालाही चाळिशीचा उंबरठा गाठावा लागलाच. मग जगभरचं कोणतंही कर्णमधुर संगीत आपलं वाटू लागलं. अगदी आजच्या नव्या संगीतकारांची रचना आणि तिकडचा ब्रायन ऍडॅम्सही आवडू लागला. त्यामुळे नव्या पिढीला जुनं संगीत आवडतंय याचं आश्चर्य वाटलं नाही. आजही चॅनल्सवरच्या बहुतेक सांगीतिक स्पर्धांमध्ये तरुणच काय, लहान मुलंही त्यांच्या लता-आशा आजींची गाणी म्हणतात. कारण ते स्वर चिरतरुणच राहिलेत. या ‘पाश्चात्त्य’ पाहणीत असंही आढळलं की, 1960 ते 90 या काळात गाण्यांचं जे सर्वंकष वैविध्य जाणवलं ते 1940 आणि 2000 नंतरच्या दशकात कमी होतं. आता यावर एखादा संगीतज्ञच नेमका प्रकाश टाकू शकेल. आपल्या इथेसुद्धा हाच काळ संगीताने कमालीचा बहरलेला दिसेल. याचा अर्थ नवं येणारं वाईट असा अजिबात नाही. त्यातही मराठीत उत्तमोत्तम संगीतकारांनी गेल्या दोन दशकांत सांगीतिक आरास मांडली आहे. अमेरिकन एड् शिरॅनसारखा एखादा गायक आजही सुरेल वाटतो. कधी रविशंकरकन्या नोरा जोन्स हिचं ‘कम अवे विथ मी’ आठवतं. एवंच काय, तर संगीताच्या क्षेत्रात जुन्या-नव्याचा वाद नाहीच. जुनं तेच सोनं असं नव्हे. ‘सोनं’ मग ते जुन्यातलं असो वा नव्यातलं टिकून राहतंच. म्हणूनच मिथोवनच्या प्रसिद्ध धूनवर ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा’ सही सही आपलं वाटतं आणि ‘मार्गारिटा’च्या चालीवरचं ‘ओ प्रिया’सुद्धा!
























































