
सामना ऑनलाईन । नागपूर
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या जयदीप कवाडे यांना अटक करून नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणे हे नवरा बदलण्याइतके सोपे नाही, असे जयदीप यांनी वक्तव्य केले होते.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी मंगळवारी काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या सभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. जयदीप यांनी म्हटले होते की, ‘ही स्मृती इराणीबाई कपाळावर मोठं कुंकू लावते. आम्ही याबाबत विचारले असता आम्हाला कोणीतरी सांगितलं, जसे नवरे बदलतात तसं तसं कुंकू मोठं होत जातं. ही नरेंद्र मोदींची मंत्री, नितीन गडकरींची मंत्री लोकसभेत बसून संविधान बदलायच्या भाषा करते तेव्हा याच नाना पटोलेंनी भरलोकसभेत सांगितलं, स्मृती इराणीबाई, संविधान बदलणे हे नवरा बदलण्याइतके सोपे नाही’ असे विधान जयदीप यांनी केले होते. जिल्हा निवडणूक अधिकाऱयांनी कवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. चौकशीमध्ये आणखी कुणी दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता.


























































