
सुधीर नागापुरे, माजलगाव
”मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात निधी देताना व विकास कामे करताना जात काढली नाही की विचारली नाही, तर फक्त विकास बघितला, मग मतदान देताना जात विचारण्याचे पाप तुम्ही करणार का? असा सवाल पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी करून ज्याच्याकडे विकासाची गोष्ट बोलायला तोंड नाही तोच जातीचे राजकारण करतो असे सांगून त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
बीड लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार खासदार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील पात्रुड येथे गुरुवारी रात्री आयोजीत जाहीर सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. या सभेस आमदार आर. टी. देशमुख, नितीन नाईकनवरे, मोहनराव जगताप, माजी आमदार केशवराव आंधळे, रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे, अच्युत लाटे, उदयसिंह दिक्खत, नगराध्यक्ष सहाल चाऊस, बबनराव सोळंके, अरुण राऊत आदीची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर बोलताना मुंडे म्हणाल्या की, काँग्रेसने 40 वर्षे जिल्ह्यातील जनतेला रेल्वेचे स्वप्न दाखवून उल्लू बनवले. मात्र, डॉ प्रीतम मुंडे यांनी 2800 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आणून प्रत्यक्ष रेल्वे आणण्याचे काम केले. 9 राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात आणले यासह कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला. असे असताना आमचे भाऊ खोटे बोलून आमच्या विरुद्ध रान उठवत आहेत. आपण दिलेल्या निधीच्या विकास कामांचे उद्घाटन रात्रीतून करतात, असे म्हणून जोरदार टीका केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला विकासाचे घेणे देणे नसून त्यांनी धर्माच्या भिंती बांधून राजकारणात जात आणली. मात्र जातीची हवा करू पाहणाऱ्यांकडे जनता ढुंकूनही पाहणार नाही असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त करून आमचे काम व विकास डोळ्यासमोर ठेवून युतीच्या उमेदवारास विजयी करा, असे आवाहन केले.


























































