काँग्रेस म्हणजे टायटानिक जहाज, दररोज थोडे थोडे बुडत आहे-नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

2014 च्या निवडणुकीनंतर काँग्रेसची स्थिती बुडत्या टायटानिक जहाजासारखी झाली आहे. या जहाजाप्रमाणे काँग्रेस दररोज थोडी थोडी बुडते आहे आणि तिच्यातील काहीजण जहाजाबाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर राष्ट्रवादी पक्षासारखे काही लोक काँग्रेसबरोबर बुडत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या मतदारसंघातील शिवसेना,भाजपा, रासप आणि रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर  आदी उपस्थित होते.

मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली, ते म्हणाले की, “देशाचा कणा असलेल्या मध्यमवर्गाला काँग्रेस शत्रू मानतो. मध्यम वर्गासाठी काँग्रेसने आतापर्यंत काही केलेले नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांचा रोष मतदानातून प्रकट होतो. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या वतीने शरद पवार, बाजूच्या मतदारसंघातले खासदार तसेच प्रफुल्ल पटेल यांनी मैदान सोडले आहे. कारण त्यांना सत्तेवर येण्याची खात्री नाही. काँग्रेसची अवस्था तर टायटानिक सारखी झाली असून, त्यांचे जहाज हळूहळू बुडत आहे”, असे मोदी म्हणाले.

तसेच “काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांना अमेठीतील पराभव समोर दिसताच त्यांनी केरळमधील वायनाड या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतू तेथेही काँग्रेसची स्थिती किती दयनीय आहे हे सांगताना मोदी म्हणाले की, वायनाडमध्ये राहूल गांधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना रोड शोमध्ये काँग्रेसचा झेंडा शोधावा लागत होता. इतक्या मागे काँग्रेसचा झेंडा होता. याशिवाय तेथे डाव्यांविरुध्द काही प्रचार करणार नाही अशी खात्री त्यांनी डाव्यांना दिली आहे.  पाकिस्तानमधून पैसे घेऊन देशातील फुटीरवाद्यांना मदत करणारे काँग्रेसला प्रिय आहेत, देशद्रोही घोषणा देणारे काँग्रेसला प्रिय आहेत. अशा काँग्रेसला मत देणे आपल्याला मंजूर आहे काय, असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला आणि जनतेने एकसूरात मंजूर नाही चा घोष केला.

आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची ताकद 2014 च्या निवडणुकीत तुम्ही दिलेल्या मतांमुळे मला मिळाली आहे. आता 2019 मधील निवडणुकीत तुम्ही जे मत द्याल त्या मताच्या आधारावर या भ्रष्टाचार्‍यांना त्यांच्या योग्य जागी (तुरुंगात) पोहंचवेल. जम्मू आणि कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला त्यांचे पिताश्री फारुख अब्दुल्ला हे हिंदुस्थानमध्ये दोन पंतप्रधान करण्याची भाषा करीत आहेत. तुम्हाला हे मान्य आहे का, असे मोदींनी त्यांच्या स्टाईलने लोकांना विचारले. नेहमीप्रमाणे लोकांनी नही असे उत्तर दिले.

पाकिस्तानने पुलवामा येथे केलेल्या हल्ल्याचा बदला आपल्या सेनेने बालाघाट येथे घेतल्यानंतर काँग्रेसने सेनेचे कौतूक करण्याऐवजी त्याबद्दल संशय व्यक्त करुन पुरावे मागितले. काँगे्रसने दहशतवादी, नक्षलवादी आणि पुâटीरवादी यांना नेहमीच समर्थन दिले आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चिरफाड करताना मोदी म्हणाले की, ज्या कायद्यामुळे आपण देशद्रोहीवर वचक बसवतो, त्या देशद्रोही विरोधी कायद्यालाच काँग्रेसचा विरोध आहे. यातील महत्वाची कलमे काढून हा कायदा निरुपद्रवी करण्याचा डाव काँग्रेसने जाहीरनाम्यात आखला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महाआघाडीच्या विरोधात जनमत इतके झपाट्याने वाढत आहे की, 2014 मध्ये काँग्रेसचे 44 खासदार होते. यावेळी तेवढेही निवडून येतात की नाही, याची खात्री नाही.

अशोक चव्हाण यांचा नामोल्लेख न करता ते म्हणाले की, सैनिकांच्या विधवा पत्नीसाठी असलेल्या आदर्श सोसायटीत भ्रष्टाचार करणाNयांना जनता माफ करणार नाही, आणि आदर्शसारखे घोटाळे होवू नयेत, यासाठीच आम्ही रेरा कायदा केला आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारावर बराच वचक बसला आहे.

या निवडणुकीत तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला दिलेले मत हे मला मिळणार आहे आणि त्या जोरावरच नवा हिंदुस्थान निर्माण करण्याची ताकद माझ्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “केंद्राने राज्याच्या विकासासाठी 13 हजार कोटींचा निधी दिला. तर 8 हजार 500 कोटीची कामे सध्या मराठवाड्यात सुरु आहेत. मराठवाड्यातील दुष्काळाच्या वेळी केंद्र सरकारने केलेली मदत मराठवाडा विसरु शकणार नाही. अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण लिडर नाहीत ते डिलर आहेत, आणि जनतेला प्रतापरावांच्या रुपाने लिडर मिळणार आहे.

राहूल गांधीची भाषणे इतकी खोटारडी आहेत की, काही दिवसांनी दूरचित्रवाणीवर मालिकेपूर्वी ज्याप्रमाणे मालिकेतील पात्रांचा किंवा त्यांच्या विचारांचा आमच्याशी काही सबंध नाही, आम्ही त्यास जबाबदार नाही, अशी सूचना देतात तशीच सूचना राजीव गांधीच्या भाषणापूर्वी दिली जाईल. काँग्रेसचा जाहीरनामा आहे की जैश ए महंमदचा जाहीरनामा आहे हेच कळत नाही, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली.