
सामना प्रतिनिधी, मुंबई
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची वाटचाल हिटलरशाहीच्या दिशेने सुरू होईल. या दोघांना पुन्हा निवडून दिले तर ही जोडगोळी देशातील निवडणुका बंद करून लोकशाहीची गळचेपी करतील. त्यामुळे मोदी-शहांना घरी बसवा असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले.
मनसेच्या वतीने शिवाजी पार्कवर गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. आपल्या सव्वा तासाच्या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी, डिजिटल इंडियापासून ते मुद्रा लोनपर्यंतच्या घोषणा किती फसव्या आहेत याचे सादरीकरणही राज ठाकरेंनी केले.
योजनांचा बोजवारा
नरेंद्र मोदी हे सर्वात खोटारडे पंतप्रधान असल्याचा आरोप करताना राज ठाकरे म्हणाले, डिजिटल इंडियाची यांनी घोषणा केली. विदर्भातील हरिसाल गाव डिजिटल करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले, मात्र या योजनेचा गावात पूर्णपणे फज्जा उडाला आहे. याचा पुरावा म्हणून राज ठाकरे यांनी मनसेने प्रत्यक्ष हरिसाल गावात जाऊन तयार केलेली चित्रफीतच दाखवली. काँग्रेसने सुरू केलेल्या सर्व योजना यांनी फक्त नावे बदलून पुढे चालू ठेवल्या, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी पंतप्रधान…
देशात इतकी वर्षे प्रयोगच झाले. जवाहरलाल नेहरूंपासून ते आतापर्यंत कोणताच पंतप्रधान निवडायचे स्वातंत्र्य जनतेला नव्हते, मग उद्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर काय फरक पडतो? देशाचे नशीब जर चांगले असेल तर एखादी चांगली गोष्ट राहुल गांधी यांच्या हातून घडेल, असेही राज ठाकरे म्हणाले.

























































