
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिलला वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ‘न्यूज 18’ला सूत्रांच्या आधारे याबाबत वृत्त दिले आहे. मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील हजर असणार आहेत. तसेच भाजप आणि मित्रपक्षांचे अन्य बडे नेतेही आवर्जुन हजर राहण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव होते. पंतप्रधान वाराणसीतून निवडणूक लढणार आहेत. 26 एप्रिलला अर्ज भरण्यापूर्वी पंतप्रधान मोदी काशि विश्वनाथ मंदिरामध्ये जाऊन शंभो शंकराचा आशिर्वाद घेतील. तसेच रविदास गेटपासून ते गोडोलियापर्यंत भव्य रोड शो देखील आयोजित करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने उत्तर प्रदेशमधून 70 पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. यंदाही तसाच विजय मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. परंतु मायावती आणि अखिलेश यादव यांच्या आघाडीमुळे भाजपपुढील आव्हान वाढले आहे. दरम्यान, 11 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज आहे.

























































