
सामना प्रतिनिधी, नांदेड
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती झाली असली तरी नांदेड जिल्ह्यात मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात इंगोले यांनी म्हंटले आहे की, काँग्रेस उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या भाऊराव चव्हाण कारखान्याने त्यांच्याकडे असलेली 2013-14 मधील गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झालेली व एफआरपी/आरएसएफची थकीत बाकी नियमानुसार व्याजासह शेतकऱ्यांना दिल्यास नांदेड जिल्ह्याच्या वतीने पुनर्निचार करण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी दिली.
काँग्रेस उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षापासून थकविलेले एफआरपीचे पैसे मिळवून देण्यासाठी व तेथील गैरव्यवहार सिद्ध करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने आम्हाला लोकवर्गणी दिली. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत आम्ही न्यायालयात अनेक याचिका दाखल करून राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू शकलो. दरम्यान काळात मला अनेक संकटाना सामोरे जावे लागले, अनेक प्रकारचा दबाव आला, प्रलोभने दाखवली, धमक्या आल्या, माझ्या घरावर दगडफेक करून काचा फोडल्या तरीही मी व माझे सहकारी डगमगलो नाही. आम्ही ईमानदारीने आमचा लढा सुरूच ठेवला आहे. भाऊरावने 2013-14 मध्ये 5 कोटी 41 लाखाचा गैरव्यवहार सिद्ध होवूनही कारखान्याने शेतकऱ्यांना पैसे दिले नाही. उलट कोर्टात गेले. अजूनही कोट्यवधी रुपयांची थकीत बाकी भाऊराव कारखान्याकडे आहे. असे असतांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला तर तो शेतकऱ्यांचा अपमान व विश्वासघात केल्यासारखे होईल, असे पदाधिकाऱ्यांचे मत आहे. म्हणून या लोकसभा निवडणूकीसाठी नांदेड जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
आमचे नेते खासदार राजू शेट्टी व नेत्यांचा आम्ही आदर करतो, याबाबत आम्ही त्यांची क्षमा मागू. पण भाऊरावकडे असलेली 80 ते 100 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची देणी व्याजासह शेतकऱ्यांना देत नाहीत किंवा देण्याचे कबूल करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांचे काम करणार नाही. कारखान्यावर झालेले काही चुकीचे निर्णय (शेतकऱ्यांना पैसे न देण्याचे) मान्य करून थकीत रकमेची अशोकराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना हमी देऊन ते पैसे कधी देणार हे जाहीर केले तर आमच्या निर्णयाचा आम्ही पुनर्विचार करू, असा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला आहे.



























































