शिक्षिकेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी माजी नगरसेवकास पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

गेल्या दोन वर्षांपासून एका सत्तावीस वर्षीय शिक्षिकेचा लैंगिक छळ करत तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी शनिवारी नवी मुंबईतील एका माजी नगरसेवकास अटक करण्यात आली. रामाशिष यादव असे त्याचे नाव असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे.

पीडित तरुणी नवी मुंबईतील एका महानगरपालिका शाळेत शिक्षिका असून सप्टेंबर 2017 साली आरोपीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच आपल्यावर लैंगिक अत्याचार करतानाचे फोटो व व्हिडीओ त्याने काढले. त्यानंतर आरोपीने फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आपल्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तरुणीवरील अत्याचाराचे हे सत्र यावर्षी जानेवारीपर्यंत सुरू होते. अखेर वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळून पीडितेने शनिवारी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी वाशी येथील दंडाधिकारी न्यायालयासमोर आरोपीला हजर केले. न्यायालयाने आरोपीला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, आरोपीचा फोन फॉरेन्सिक लॅबोरेटरीत पाठवण्यात आला असून त्यातून नक्कीच काहीतरी पुरावे मिळतील. त्यानंतर आरोपीवर पुढील कारवाई करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस अधिकारी नितिन गीते यांनी सांगितले आहे.