शिवसेना हे खणखणीत नाणे : खासदार विनायक राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

एकशे तीस कोटी लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानच्या संसदेत बसण्याचा मान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळाला. २५ लाख लोकसंख्या असलेल्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारा खासदार म्हणून ५ वर्षे संधी मिळाली. यापुढेही या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी आपले प्रेम असेच कायम ठेवा. असे भावनिक आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यानी  पेंडुर येथे बोलताना केले.

दरम्यान, शिवसेना हे खणखणीत नाणे आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हे नाणे जनतेच्या विश्वासावर खणखणीत वाजेल, असा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला.

मालवण तालुक्यातील पेंडुर येथे  शिवसेना-भाजप महायुतीची सभा पार पडली. यावेळी आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, भाजपचे संदेश पारकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले, नजीकच्या पेंडुरच्या तलावाचे काम केले. २००८ सालापासुन रखडलेले वराड सोनवडे पुलाचे काम माझ्याकळात सुरु केले. २००९ मध्ये ९ कोटी रुपये खर्च असलेला हा पुल साडेबारा कोटी रुपयांच्या खर्चाच्या घरात गेलेला आहे. पुलाला मंजूरी मिळालेली असली तरी काहीजण सीआरझेडचे कारण पुढे करुन कॉन्ट्रॅक्टरने पैसे दिले नाहीत म्हणून काहीजण या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वराड सोनवडे पुल होणारच असे ते म्हणाले.