
सामना ऑनलाईन । मुंबई
मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागाने काही दिवसांपूर्वीच दिला होता. सध्या या ठिकाणी तशीच परिस्थिती असून पारा तब्बल 44 डिग्री सेल्सियसवर पोहचला आहे. मुंबईचा पारा 33.5 डिग्री इतका आहे पण उन्हाचे चटके कायम आहेत. गेल्याच महिन्यात मुंबईचा पारा चाळिशीपार पोहचला होता. त्यानंतर मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.
मुंबईकरांना आतापासूनच वैशाखवैणवा जाणवू लागला आहे. मे महिना उजाडायला अजून 20 दिवस शिल्लक आहेत, परंतु उष्णतेचा कहर आतापासूनच बरसू लागला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या ऍण्टीसायक्लॉन म्हणजेच प्रतिचक्रवाती वाऱ्यांमुळे तापमान वाढल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेशातून येणाऱ्या कोरडय़ा उष्ण वाऱ्यांचा परिणाम म्हणूनही राज्यात तापमान चांगलेच वाढले आहे.
- राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी 44. 2 डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले.
- विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- मुंबईत हवामान कोरडे राहणार.
- मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही हवामान कोरडे राहणार.
- कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातही तापमान कोरडे राहण्याची शक्यता.
शहर . तापमान
- नागपूर … 44.1
- चंद्रपूर …. 43.8
- अकोला ….. 43
- अमरावती 42.2
- बुलढाणा .. 40.6
- ब्रह्मपुरी … 44.2
- गडचिरोली .. 41
- गोंदिया … 40.8
- वर्धा ………. 43
- वाशीम ……. 41
- यवतमाळ …. 41.6




























































