मुंबईचे डबेवाले सहा दिवसांच्या सुट्टीवर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईचे डबेवाले सोमवार, 15 एप्रिलपासून सहा दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहेत. डबेवाले ज्या गावातून मुंबईला आले त्या मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर या भागातील गावांमध्ये सध्या यात्रेचा मोसम सुरू झाला आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी डबेवाल्यांनी सोमवार 15 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत जेवणाचे डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवली आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनने दिली आहे. या सहा दिवसांच्या सुट्टीत महावीर जयंती व गुड फ्रायडे या दोन सरकारी सुट्टय़ा आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने चारच दिवस सुट्टी डबेवाले घेणार आहेत. सोमवार 22 एप्रिलपासून डबेवाले पुन्हा सेवेवर रुजू होतील. बहुतांश शाळा, कॉलेज यांना तसेच काही सरकारी, निमसरकारी कार्यालयांतील अधिकारीवर्ग उन्हाळय़ाच्या सुट्टीवर गेल्यामुळे त्यांची सेवा अशीही बंदच आहे. डबेवाल्यांनी घेतलेल्या सुट्टीने ग्राहकांची गैरसोय होणार नाही, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.