सिंगापूर ओपन बॅडमिंटन : हिंदुस्थानची मदार सिंधूवरच, महिला एकेरीत सायना हरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंगापूर

हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंसाठी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतला शुक्रवारचा दिवस निराशाजनक ठरला. रिओ ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू वगळता हिंदुस्थानच्या एकाही बॅडमिंटनपटूला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले. महिला एकेरीत सायना नेहवाल, पुरुष एकेरीत समीर वर्मा, किदाम्बी श्रीकांत आणि दुहेरीत प्रणव चोप्रा-सिक्की रेड्डी यांना निराशेचा सामना करावा लागला.

पी. व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या साय यानयान हिला 21-13, 17-21, 21-14 अशा फरकाने पराभूत करीत उपांत्य फेरीत आगेकूच केली. आता तिला उपांत्य फेरीत माजी वर्ल्ड चॅम्पियन नोझोमी ओकुहरा हिचा सामना करावयाचा आहे. पी. व्ही. सिंधू या मोसमात दुसऱयांदा अंतिम चारमध्ये पोहोचली आहे. नोझोमी ओकुहरा हिने ‘शटलक्वीन’ सायना नेहवालवर 21-8, 21-13 अशा फरकाने विजय मिळवला.

पुरुषांमध्ये निराशा

किदाम्बी श्रीकांत व समीर वर्मा या दोघांकडून हिंदुस्थानला मोठी अपेक्षा होती, पण दोघांचाही खेळ खल्लास झाला. केण्टो मोमोटाने किदाम्बी श्रीकांतला 21-18, 19-21, 21-9 अशा फरकाने नमवले. तसेच चाऊ टिन चेन याने समीर वर्माला 21-10, 15-21, 21-15 असे हरवले. दुहेरीत प्रणव चोप्रा व सिक्की रेड्डीला पराभूत व्हावे लागले.