
सामना प्रतिनिधी। मुंबई
देशात यंदा सरासरीच्या जवळ 96 टक्के म्हणजे समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे बळीराजा सुखावेल आणि दुष्काळाची तीव्रता कमी होईल अशी आशा निर्माण झाली आहे; पण सलग दोन वर्षे चुकलेला हवामान खात्याचा अंदाज पाहता हा कॉपीपेस्ट अहवाल खरा ठरणार का, हा लाखमोलाचा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या 97 टक्के मान्सूनचा पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात 91 टक्केच बरसला आणि मराठवाडा, विदर्भासह देशाचा बराच भाग दुष्काळाने होरपळला आहे.
केंद्रीय भूगर्भ विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन नायर यांनी पत्रकार परिषदेत मान्सूनचा पहिला अंदाज वर्तविला. जूनच्या पहिल्या आठवडय़ात दुसरा आणि अंतिम अंदाज वर्तविला जाईल. जून ते सप्टेंबर या काळात 90 ते 95 टक्के मान्सूनचा पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा कमी, तर 96 ते 104 टक्के म्हणजे सरासरी पाऊस मानला जातो. गेली तीन वर्षे हवामान खाते सरासरी पावसाचा अंदाज वर्तवीत आहे. मात्र, अंदाजापेक्षा कमी पाऊस पडतो असा अनुभव आहे.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांच्या हवामान विभागांनी यंदा मान्सूनवर अल निनोचे सावट असल्याची शंका व्यक्त केली होती. अल निनोमुळे देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज होता; परंतु हिंदुस्थानच्या हवामान विभागाने ही शंका फेटाळून लावली आहे. यंदा देशाच्या काही भागांत मे ते जूनदरम्यान तापमान 0.5 डिग्रीने वाढेल असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
गेल्या वर्षी अनेक भागांत कमी पाऊस
गेल्या वर्षीही आयएमडीने 97 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता; मात्र 91 टक्के पाऊस झाला होता. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, झारखंड, राजस्थान, तामीळनाडू या राज्यांतील जवळपास 130 जिह्यांमध्ये पाऊस सरासरीच्याही कमी झाला होता.
स्कायमेटचा काय होता अंदाज?
स्कायमेटने यंदा सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. म्हणजेच पाऊस साधारणपेक्षाही कमी होईल असे स्कायमेटने म्हटले होते.
केरळमध्ये कधी धडकेल मान्सून
मे महिन्याच्या मध्यापर्यंत मान्सून केरळमध्ये कधी धडकेल याबाबतची तारीख निश्चित होऊ शकेल. यंदा अल निनोचा नाही, तर ला निनोचा प्रभाव असेल. ला निनोमुळे मान्सूनची स्थिती समाधानकारक असेल. परिणामी हिंदुस्थानात सगळीकडे समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे.
काय आहे ‘ला निनो’ आणि ‘अल निनो’
जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान कमी होते तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात. मान्सूनसाठी ही परिस्थिती अनुकूल असते त्याला ला निनो म्हणतात, तर प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे सतत तीन महिने 0.5 डिग्री सेल्सिअस ते 0.9 सेल्सिअसपर्यंत वाढते अशा परिस्थितीत पावसाचे प्रमाण कमी होते.
ठळक बाबी
गेल्या वर्षी सरासरी 91 टक्के इतका कमी पाऊस झाला होता. देशात 28.13 कोटी टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते. मात्र, कमी पावसामुळे रब्बीचे पीक मराठवाडय़ासह अनेक भागात घेता आलेले नाही. यामुळे शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले आहे. देशातील 70 टक्के शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. देशात केवळ 40 टक्केपेक्षा कमी क्षेत्र सिंचनाखाली आहे. कमी पावसाचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसतो. पर्यायाने महागाईत वाढ होते.



























































