
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड व परिसरात काल रात्री व सायंकाळी मध्यम ते जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
हवामान खात्याने १५ व १६ एप्रिल रोजी नांदेड शहर व जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविली होती. काल रात्री नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर, मुक्रमाबाद, माळाकोळी, मालेगाव परिसर, माहूरचा काही भाग, सोनखेड, कौठा, तुप्पा आदी भागात पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरांवरची पत्रेही उडाली. नांदेड शहर व परिसरात आज सायंकाळी पाचच्या नंतर जवळपास अर्धा तास पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मालेगाव, अर्धापूर, तुप्पा, मुदखेडचा काही परिसर, बारड, भोकरचा काही परिसर या भागात देखील पाऊस झाला आहे. अनेक भागामधील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. या पावसामुळे अंबा व केळीची मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काल रात्री माळाकोळी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने अनेकांच्या घरावरची पत्रे उडून गेली. देगलूर तालुक्यात देखील या अवकाळी पावसाने हजेरी लावली. बरबडा परिसरात काल रात्री पाऊस झाला यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले तर वीज वितरण कंपनीच्या खांबावरील तारा तुटून पडल्या. जिल्ह्यातील काही भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला असून, यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.




























































