बुरखा घालून पुरूष करताहेत मतदान, भाजप खासदाराचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । लखनौ

लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देशातील 13 राज्यात 95 उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये बंद होत आहे. दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 8 जागांसाठी मतदान होत आहे. किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडत असतानाच अमरोहा येथील भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार कंवर सिंह तन्वर यांनी गंभीर आरोप केला आहे. बुरखा घालून पुरूष मतदान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याआधी पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी देखील मुजफ्फरनगरमधील भाजप उमेदवाराने असाच आरोप केला होता.

गुरुवारी अमरोहा येथील भाजप उमेदवार कंवर सिंह यांनी मतदान केले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अमरोहातील अनेक ठिकाणी बनावट मतदान होत असल्याचा आरोप केला. नौगावमध्ये बनावट मतदान होत असून बुरखा घालून आलेल्या महिलांची तपासणी होत नाही. पोलिंग बुथवर उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्याला ही माहिती दिल्याचे ते म्हणाले. तसेच बुरखा घालून आलेल्या एका पुरुषाला पकडल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, अमरोहामध्ये कंवर सिंह तन्वर यांच्याविरोधात सपा-बसपाचे दानिश अली आणि काँग्रेसचे सचिन चौधरी यांचे आव्हान आहे. 2014 ला कंवर सिंह यांनी भाजपच्या तिकिटावर येथून मोठा विजय मिळवला होता.