
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
मोठय़ा आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजची विमाने बुधवारी पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे जवळपास 22 हजार कर्मचाऱयांपुढे ‘आता खायचे काय’ असा प्रश्न आ वासून उभा राहिला. गेल्या चार महिन्यांत पगाराचा नवा पैसा न मिळालेले हे कर्मचारी उपजीविकेसाठी दुसऱया नोकऱया शोधू लागले आहेत. इतर विमान कंपन्यांनी जेटमधील अनुभवी कर्मचाऱयांना सामावून घ्यायला सुरुवात केली आहे. स्पाईसजेटने नुकतेच जेटच्या 500 कर्मचाऱयांना सामावून घेतले. पण जेटच्या कर्मचाऱयांची संख्या जास्त असल्याने त्यांना मिळेल त्या पगारात काम करावे लागणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.
या कर्मचाऱयांना इतर एअरलाइन्स कंपन्यांमध्ये त्यांच्या अनुभवामुळे घेतले जाईल हे नक्की, पण तेथे त्यांना वेतन आधीपेक्षा कमी मिळेल अशी भीती एचआरतज्ञांनी व्यक्त केली आहे. हिंदुस्थानच्या विमानचालन क्षेत्रामध्ये तज्ञ आणि अनुभवी कर्मचाऱयांना मोठी मागणी आहे. पण एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर विमान कंपन्यांमधले कर्मचारी दुसऱया कंपन्यांमध्ये जॉब शोधू लागल्यामुळे त्यांना मिळेल त्या वेतनावर काम करावे लागू शकते, असेही या तज्ञांचे म्हणणे आहे.
कंपन्यांना कर्मचारी पुरवणाऱया ‘टीमलीज सर्व्हिसेस’च्या सहसंस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्षा रितूपर्णा चक्रवर्ती यांनी याबाबत बोलताना सांगितले की, हिंदुस्थानातील विमानचालन क्षेत्र खूप मोठे आहे. आणखी बऱयाच कर्मचाऱयांना सामावून घेण्याची क्षमता त्या क्षेत्रात आहे. सध्याच्या वातावरणातही या क्षेत्रातील कर्मचारी आणि वैमानिकांचा पुरवठा मागणीपेक्षा कमीच होत आहे. इतर विमानचालन कंपन्याही आपल्याला हवे तसेच कर्मचारी घेणार हे नक्की. त्यांना जेट एअरवेजमधले अनुभवी कर्मचारी फायद्याचेच ठरतील. पण तरीही ते या कर्मचाऱयांची गरज पाहून त्यांना कमी पगारावरच ठेवतील, असेही त्या म्हणाल्या.
‘इत्तिहाद एअरवेज’ची जेटमध्ये गुंतवणूक
आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या 22 हजार कर्मचाऱयांपुढे ‘आता खायचे काय’ असा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. गेल्या चार महिन्यांत पगाराचा नवा पैसा न मिळालेले हे कर्मचारी उपजीविकेसाठी दुसऱया नोकऱया शोधू लागलेले असतानाच आशियातील सर्वात मोठे उद्योगपती असा लौकिक असलेले मुकेश अंबानी जेटमध्ये गुंतवणूक करणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ‘इत्तिहाद एअरवेज’च्या माध्यमातून अंबानी जेटमध्ये ही गुंतवणूक करणार असून त्यानंतर जेट एअरवेजमध्ये एतिहादची गुंतवणूक 49 टक्के होणार आहे. मुकेश अंबानी यांनी जेटमध्ये गुंतवणूक केली तर त्या कंपनीतील 22 हजार कर्मचाऱयांची रोजीरोटी वाचू शकते असे तज्ञांनी म्हटले आहे.
जेटची विमाने पुन्हा उडतील
बुधवारी जेट एअरवेजची सर्वच विमाने जमिनीवरच स्थिरावली असली तरी येत्या आठवडाभरात यातील काही विमाने पुन्हा आभाळात उडताना दिसणार आहेत. बहुधा मंगळवारपासूनच जेट एअरवेजची 30 ते 40 बोइंग-737 विमाने स्पाईसजेट उडवणार असून एअर इंडियासुद्धा जेटची 5 बोइंग-777 आणि काही बी-737 ही विमाने चालवणार असल्याचे काही ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. यामुळे जेटची 40 ते 45 विमाने लवकरच कार्यान्वित होतील अशी शक्यता आहे. यामुळे जेट एअरवेजच्या काही कर्मचाऱयांना काम आणि पैसा मिळू लागणार आहे. कारण या कंपनीतील विमानांसह काही क्रू मेंबर्सनाही भाडय़ाने घेतले जाणार आहे असे कळते.
अरुण जेटली लक्ष घालणार
आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱयांनी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची राजधानी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्यासमोर आपले गाऱहाणे मांडले. त्यावेळी या प्रकरणी आपण लक्ष घालणार आहोत असे आश्वासन जेटली यांनी जेटच्या कर्मचाऱयांना दिल्याचे कंपनीचे सीईओ विनय दुबे यांनी सांगितले. यावेळी दुबे यांच्यासोबत महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, नागरी हवाई दलाचे सचिव प्रदीपसिंह खरोला, कंपनीचे चीफ फायनान्स ऑफिसर अमित अगरवाल यांच्यासहित जेटचे अनेक कर्मचारी, तंत्रज्ञ आणि क्रू मेंबर्सही उपस्थित होते.




























































