सामना ऑनलाईन, वसई
‘रात्रीस खेळ चाले’ या गाजलेल्या मालिकेतील इसरलंय.. हा पांडूचा डायलॉग प्रत्येक घराघरात पोहोचला आहे. त्याशिवाय दोन हजारांच्या गुलाबी, पाचशे, शंभर व पन्नासच्या नव्या नोटा हा नेहमी चर्चेचा विषय बनतो. पुलवामा हल्ल्यातील जिगरबाज अभिनंदनची कामगिरी आणि नव्या हिंदुस्थानचे स्वप्न पाहणारी शहीद जवानाची पत्नी हे सारे जिव्हाळ्याचे विषय आपल्या रांगोळीतून साकारले आहेत जुचंद्र या गावातील रांगोळी कलाकारांनी. हा रंगीबेरंगी आविष्कार पाहण्यासाठी सध्या वसईतील रसिकांची गर्दी होत आहे.
चंडिका मातेच्या यात्रोत्सवानिमित्त हा अपूर्व योग जुळवून आणला आहे. विविध भागातून भाकिक मातेच्या दर्शनाला येत असून रांगोळीचे प्रदर्शन बघून प्रत्येकाच्या मुखातून वा.. क्या बात है.. असेच उद्गार निघत आहेत. चंडिका कलादालनातील रांगोळ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत.
या कलाकारांचा गौरव
देशभक्तीपासून ते सामाजिक आशयाचा संदेश देणाऱ्या रांगोळी कलाकारांचा आयोजकांनी खास गौरव केला आहे. त्यात मनोज पाटील, जयकुमार भोईर, शैलेश पाटील, केतन पाटील, अक्षता पाटील, चंद्रशेखर गावड, प्रवीण भोईर, अभिषेक महाडिक, मुकेश वैष्णव, गणेश शिगवण, जय म्हात्रे, विघ्नेश भोईर, नितीन भोईर, प्रसाद पाटील, मिलिंद पाटील या कलाकारांचा समावेश आहे.
प्रदर्शनात संस्कार भारती, थ्रीडी रांगोळी, निसर्गचित्र, पोर्ट्रेट रांगोळी अशा किकिध रांगोळीच्या प्रकारांचा समाकेश करण्यात आला आहे.या रांगोळ्यांतून सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.
आई चंडिका कलादालनात या रांगोळ्या काढण्यात आल्या असून पुढील दोन दिवस त्या येणाऱ्या भाविकांना पाहायला मिळणार आहेत. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, अभिनंदन वर्धमान, छत्रपती शिवाजी महाराज, गणपती, वीटभट्टीवरील बालकामगार, स्वराज्यरक्षक संभाजी यांचे प्रभावी चित्रण रांगोळीद्वारे करण्यात आले आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील कलाकार, 500 व 2000 रुपयांच्या नोटा, बाटलीतील जहाज अशा एकापेक्षा एक सरस रांगोळ्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.





























































