काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिर्डी

लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील प्रचार सुरू असताना नगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. याआधी गुरुवारी नगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण ससाने यांनीही पदाचा राजीनामा दिला. राहुल गांधींची शुक्रवारी शिर्डी मतदारसंघासाठी संगमनेरमध्ये सभा आहे, त्यापूर्वीच काँग्रेसला दोन धक्के बसले आहेत.

राधाकृष्ण विखे यांची भूमिका शिर्डीत ठरणार निर्णायक

गुरुवारी शिर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषद घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विखे समर्थक असलेले करण ससाने यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. तसेच त्यांचा राजीनामा स्वीकारत जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाचा समावेश असतानाही त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही. याप्रकरणी बुधवारी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावरील कारवाईचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल असे अशोक चव्हाण यांनी सांगितले होते.