राधाकृष्ण विखे यांची भूमिका शिर्डीत ठरणार निर्णायक

सामना प्रतिनिधी । नगर

नगर लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता शिर्डी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या दोन दिवसात अनेकांच्या सभा होणार आहेत. महायुतीचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांची सभा होणार आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे. त्यातच आता विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे हे देखील आपली भूमीका जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे.

नगर लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा चुरस पहायला मिळाली. जिल्हयात यावेळेला सर्वाधिक मतदान यावेळेला झाले परंतु दुसरीकडे मात्र, मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी मतदारांची संख्या देखील वाढली आहे, हे सुध्दा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यावेळेला सर्वाधिक मतदान महिला वर्गाचे झाले आहे. त्यामुळे ती मते निर्णायक ठरणार आहे.

आता शिर्डी लोकसभा निवडणूक ही दि.29 रोजी होत आहे. 26 तारखेला प्रचाराची सांगता होणार आहे. दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची संगमनेर येथे जाहीर सभा पार पडली. सर्वाधिक गर्दीचा उच्चांक त्या सभेला पाहायला मिळाला. महायुतीच्या प्रचारार्थ आता नेवाशात आज मंत्री पंकजा मुंडे यांची सभा पार पडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस हे श्रीरामपुर येथे सभा घेणार असून त्या दृष्टीकोणातून त्याचे नियोजन सुरु झाले आहे.

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी तसेच शिवसैनिकांनीदेखील प्रत्येक गावापर्यत जावून महायुतीने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यास सुरवात केली आहे. नगरची निवडणूक पार पडल्यानंतर आता दक्षिण भागातील पदाधिकारीसुध्दा शिर्डी मतदार संघातमध्ये आज पासूनच प्रचाराच्या कामाला लागले आहेत. त्याच बरोबरीने भाजपासह महायुतीतील घटपक्ष देखील लोखंडे यांच्या प्रचारार्थ रॅलीचे नियोजन करुन प्रत्येक गावापर्यंतचे नियोजन आखले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने देखील सभांचे आयोजन केले आहे. आज शरद पवारांची सभा पार पडली. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या सभेचेही नियोजन करण्यात आले आहे.

महायुतीकडून सुजय विखे यांनी नगरची उमेदवारी केली आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी नगरमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नाही, असे सुतोवाच केले होते. नगर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी पडद्यामागुन सुत्रे एक प्रकारे हलवली होती. पण आता शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांची भूमिका निर्यायक ठरणार आहे. त्यातच राहुल गांधी यांची सभा होणार असल्याने ते सभेला उपस्थित राहणार की नाही याची सुध्दा चर्चा राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे. बहुधा एक दोन दिवसात विखे आपली भूमीका जाहीर करतील, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नगरचे उमेदवार सुजय विखे यानी शिर्डीत महायुतीचे उमेदवार लोखंडे यांना निवडणून आणण्यासाठी आजपासूनच बैठका व प्रचार फेर्‍याचीं नियोजन करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता प्रचाराची लगबग शिर्डीत वाढली आहे.