
>> शैलेश माळोदे, [email protected]
प्रा. मनमोहन शर्मा. हाडाचे शिक्षक. रसायनशास्त्रातील संशोधन, अध्यापन हेच त्यांचे जगणे.
“माझ्या आयुष्यात मला प्रा. शर्मांसारखे गुरू म्हणून लाभले याबद्दल मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो’’ हे उद्गार आहेत डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे. प्रा.मनमोहन शर्मा यांच्या रेडिओ आत्मकथनासाठी डॉ. माशेलकर यांच्याशी मी संपर्क साधला होता. त्यावेळी सीएसआयआरच्या महासंचालकपदी असलेल्या डॉ. माशेलकर यांनी अत्यंत ‘बिझी’ असतानाही मुंबईला येऊन मुलाखत घेण्याचं मान्य केलं. त्यावेळी त्यांनी प्रा. शर्मांविषयीच्या आठवणी सांगितल्या. प्रा. मनमोहन शर्मा यांच्याशी माझा प्रथम संपर्क झाला तो यूडीसीटी (आताची इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) या संस्थेवर रेडिओ फिचर बनविण्यासाठी ते संचालक असताना. प्रा. शर्मा हे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, शिस्तीचे आणि तरीही तितकेच साधे असलेले आणि दिसताच आदर वाटावा असे. पुढे अनेकदा त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली.
1 मे 1937 रोजी जोधपूरला जन्मलेल्या प्रा. मनमोहन शर्मांचं शिक्षण जोधपूर, मुंबई आणि केंब्रिजला झाले. वयाच्या 21 व्या वर्षी ते प्राध्यापक म्हणून यूडीसीटीत रुजू झाले. मुंबई विद्यापीठाचा भाग असूनही हा विभाग पूर्णपणे वेगळी कार्य आणि शिक्षण संस्कृती असलेला होता. जेव्हा शिक्षणासाठी प्रा. शर्मा प्रथम मुंबईत आले तेव्हाची आठवण सांगताना ते म्हणाले, ‘‘मी राजस्थानातल्या मारवाडसारख्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असलेल्या क्षेत्रातून आलो होतो. जेव्हा मी वसतिगृहातला नळ सोडला तेव्हा वेगानं पाणी आलं, शॉवरमधून पाणी अंगावर येऊ लागलं. हा माझा प्रथमच अनुभव होता, पाणी इतक्या मुबलकपणे अंगावर घेण्याचा. कोणतंही साधन, विशेषतः पाण्यासारखं साधन अत्यंत व्यवस्थित प्रभावीपणे वापरावं याचं मिळालेलं बाळकडूच. मला त्यानंतरदेखील संपूर्ण करीअरमध्ये उपयुक्त ठरलं. हिंदुस्थानी रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रातलं आयकॉनिक व्यक्तिमत्त्व असलेले प्रा. शर्मा 1990 साली लंडनच्या रॉयल सोसायटीचे पहिले रासायनिक अभियंता म्हणून निवडले गेले. 2001 साली त्यांना हिंदुस्थान सरकारनं पद्मविभूषणानं सन्मानित केलं. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेले प्रा. शर्मा हे हाडाचे शिक्षक असून त्यांना संशोधन आणि अध्यापन या विषयातच रुची आहे. ते एकदा म्हणालेदेखील, ‘‘रासायनिक प्रक्रिया उद्योगाचा सल्लागार म्हणून गेल्या 53-54 वर्षांत मला पैसे कसे कमवायचे हे ठाऊक आहे, परंतु मला खरा आनंद संशोधन आणि शिकवण्यात मिळतो. हिंदुस्थान सरकारनं त्यांना देऊ केलेलं सीएसआयआरचे महासंचालक पदही त्यांनी नाकारून आयुष्यभर प्राध्यापक म्हणून काम करण्यालाच महत्त्व दिलं.
संशोधन क्षेत्रात करीअर करण्यामागची प्रेरणा विषद करताना ते म्हणाले, 1958 साली जेव्हा मी रासायनिक अभियांत्रिकी विषयात पदवी मिळविली तेव्हा बाजारपेठेत नोकऱयांच्या पुष्कळ संधी होत्या आणि तरुण अभियंत्यांसाठी उद्योगात नोकरी लाभणं ही मानाची गोष्ट होती. मी कोणतीही मुलाखत दिली नाही. कारण मला संशोधनच करायचं होतं. कारण ते माझ्या आवडीचे होते आणि मी त्याच्याशी बांधिल होतो. अनेकांना माझा निर्णय पसंत नव्हता, पण मला हेच करायचं होतं आणि मला कधीही त्याचा पश्चात्ताप झाला नाही.
विद्यार्थ्यांचं शिक्षण महत्त्वाचं. त्यांचा वेळ वाया जाता कामा नये असे प्रा. शर्मांना नेहमी वाटे. त्यांच्या लहान मुलाचं निधन झाल्यावर अवघ्या 24 तासांनी त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला त्याच्या प्रबंधाचा मसुदा तपासण्यासाठी पाठवून द्यायला सांगितले. प्रा. शर्मा यांना अध्यात्मातही खूप रस असून ‘रामचरितमानस’ अत्यंत आवडतं. आकाशवाणीच्या संवादिता चॅनेलवरून ते रोज सकाळी प्रसारित होतं.
प्रा. शर्मांनी हिंदुस्थानातील संशोधनाबाबत खूपच मूलभूत विचार केलेला आहे. निधीची कमतरता हा मुद्दा नसून नावीन्यपूर्ण कल्पना असणे जास्त महत्त्वाचं असं मानणारे प्रा. शर्मा म्हणतात, हिंदुस्थानात संशोधनासाठी निधीपेक्षाही लोकांकडे चमकदार कल्पना मात्र हव्यात. माझ्या काळात 1960 च्या दशकात वित्तीय स्थिती अत्यंत वाईट होती आणि म्हणून आम्ही उद्योगासाठी उपयुक्त, स्वस्त आणि साध्या प्रयोगांवर आधारित कल्पनांवर भर दिला. तेव्हा आम्हाला कंपन्यांकडून रसायनं भेट म्हणून मिळायची. त्यांच्याशी आम्ही चांगले संबंध ठेवले होते. हिंदुस्थानच्या शिक्षण क्षेत्राविषयी सकारात्मक दृष्टीनं विचार करणाऱया प्रा. शर्मांना हिंदुस्थानची मेरिट आधारित निवड प्रक्रिया चांगली वाटते. ते म्हणतात, हिंदुस्थानचे सर्वात मोठं यश म्हणजे ही गुणवत्ताधारित प्रवेश प्रक्रिया. तुम्हाला चांगले गुण असल्यास कोणीही थांबवू शकत नाही आणि नसल्यास कोणीही काही करू शकत नाही. प्रा. रघुनाथ माशेलकर माझे विद्यार्थी होते. त्यांचे वडील लवकर वारले आणि त्यांच्या आईने घरकाम करून त्यांना वाढवलं. गुणवत्तेमुळे सगळा फरक पडतो. असे प्रा. एम. एम. ऊर्फ मनमोहन शर्मा. एक कुटुंबवत्सल, करडय़ा शिस्तीचे भोक्ते आणि हाडाचे शिक्षक, संशोधक तरुणांसाठी आदर्श नाही तर काय आहेत? आयकॉन!
























































