राधाकृष्ण विखे-पाटील शिवसेनेच्या व्यासपीठावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, शिर्डी

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी आज जाहीर सभा घेतली. विखे-पाटील शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे ते भाजपात जाणार की शिवसेनेत याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर त्यांनी जाहीर टीका केली.

विखे-पाटील यांनी आतापर्यंत पुत्र सुजय विखे-पाटील यांच्यासाठी नगरमध्ये छुपा प्रचार केल्याचे उघड झाले होते. यावरून त्यांच्यावर आघाडीच्या नेत्यांनी टीकाही केली होती. परंतु, आता त्यांनी जाहीरपणे प्रचार सुरू केला असून आज महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी साकुरी गावात सभा घेतली. यावेळी त्यांनी त्यांचे कट्टर विरोधक काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.

विखे आज राजकीय भूमिका जाहीर करणार
राधाकृष्ण विखे-पाटील आपली राजकीय भूमिका उद्या 27 एप्रिल रोजी जाहीर करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनीच दोन दिवसांपूर्वी दिली होती. परंतु, त्याआधीच ते शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे ते नेमक्या कोणत्या पक्षात जाणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला ते उद्या उत्तर देणार आहेत.