
सामना प्रतिनिधी, मुंबई
उन्हाच्या तीव्रतेने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असून त्याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट झाली असून भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. भाज्यांची चव वाढविणारी कोथिंबीर थेट शंभर रुपये जुडी झाली आहे. फळभाज्या सरासरी साठ रुपये प्रतिकिलो आहेत. तर पालेभाज्या सरासरी ऐंशी रुपये प्रतिकिलो आहेत. भाजीपाल्यांच्या दरवाढीमुळे मध्यमवर्गीय गृहिणींनी भाजीमंडईकडे सध्या तरी पाठ फिरविली आहे.
मागणी जास्त आणि उत्पादन कमी अशी स्थिती झाल्याने भाजीपाल्याचे दर मोठय़ा प्रमाणात कडाडले आहेत. भाज्यांची चव वाढविणारी कोथिंबीर शंभर रुपये झाली आहे. एरव्ही सरासरी सात ते दहा रुपये प्रतिकिलो या दराने विकले जाणारे टोमॅटो आता पंचवीस ते तीस रुपये प्रतिकिलो झाले आहेत. फळभाज्यांमधील गिलके, दोडके, कारले, गवार, फ्लॉवर कोबी, भेंडी, कारले, पोकळा या भाज्या सरासरी साठ रुपये प्रतिकिलो झाल्या आहेत. तर पालेभाज्यांमधील मेथी, पालक या भाज्या ऐंशी रुपये किलो झाल्या आहेत. दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घेणे कठीण होईल. साहजिकच किमान महिनाभर भाजीपाल्याचे दर वाढतच राहतील, अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

























































