
सामना ऑनलाईन, कोलंबो
ईस्टर संडेला झालेल्या भयंकर दहशतवादी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत मुस्लीम महिलांना बुरखा परिधान करण्यास बंदी घातली आहे. दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला शिरीसेना यांनी सांगितले.
ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत तीन चर्च आणि तीन लक्झरी हॉटेल्स येथे 9 आत्मघाती दहशतवाद्यांनी भयंकर बॉम्बस्फोट केले. यात 253वर नागरिक ठार झाले, तर 500वर जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकन सरकारने सुरक्षेसाठी अनेक उपाय योजले असून त्यात मुस्लीम महिलांना चेहरा पूर्ण झाकण्यास बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही बंदी असल्याचे राष्ट्रपती शिरीसेना यांनी म्हटले आहे. श्रीलंकेत 10 टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे. दरम्यान, श्रीलंकेत सुरू असलेल्या टेरर हीट आऊट मोहिमेत आतापर्यंत 106 संशयितांना अटक केली आहे. दरम्यान श्रीलंकेतील धार्मिक स्थळांवर महिला बॉम्बर हल्ले होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे.
पोलीस प्रमुख बडतर्फ
गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेत कुचराई केल्याचा ठपका ठेवत श्रीलंकन पोलीस दलाचे प्रमुख पुजिथा जयसुंदरा यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. तीन दिवसांपूर्वी जयसुंदरा यांनी राजीनामा दिला होता. आज राष्ट्रपती शिरीसेना यांनी त्यांच्यावर थेट बफतर्फीची कारवाई केली आहे.
श्रीलंकेत मुसलमानांवर प्रतिहल्ले होऊ देणार नाही – आर्च बिशप
श्रीलंकेत अलीकडेच इस्टर संडेला मुस्लिम दहशतवादी संघटनेने साखळी बॉम्बस्फोट केले. यामध्ये 250 पेक्षा अधिकजण ठार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोलंबोचे आर्च बिशप कार्डिनल, मालकोलम रणजिथ यांनी श्रीलंकेतील मुस्लिमांना आश्वस्त केले आहे. कॅथलिक चर्च मुसलमानांवर प्रतिहल्ले होऊ देणार नाही, सूडनाटय़ करू देणार नाही असे रणजिथ यांनी म्हटले आहे. दरम्यान, साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर अधिक आक्रमकपणे सरकारने कारवाई करावी अशी अपेक्षाही रणजिथ यांनी केली आहे. या बॉम्बस्फोटप्रकरणी सरकारने केलेल्या चौकशीबाबत आम्ही समाधानी नाही. सरकारच्या सर्व सुरक्षा दलांनी एकजुटीने युद्धपातळीवरून दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करावी, असेही आर्च बिशप यांनी म्हटले आहे.



























































