
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भाजपमधून बाहेर पडत काँग्रेसमध्ये सामील झालेले शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा या सर्वात श्रीमंत उमेदवारी ठरल्या आहेत. देशात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा सुरू आहे. या टप्प्यातील 184 कोट्यधीश उमेदवारांमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवार पूनम सिन्हा या सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचं समोर आलं आहे. पूनम सिन्हा या लखनौ येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाच्या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती नमूद आहे. या अहवालात पाचव्या टप्प्यात जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्यापैकी 28 टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. यात सर्वात वरचा क्रमांक समाजवादी पक्षाच्या पूनम सिन्हा यांचा असून त्यांच्याकडे 193 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पूनम सिन्हा यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विजय कुमार मिश्रा असून त्यांच्याकडे प्रगतिशील समाजवादी पक्षाचे उमेदवार आहेत.
या अहवालानुसार लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांची सरासरी संपत्ती 2.57 कोटी इतकी आहे. तर मोठ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती 6.9 कोटी इतकी आहे, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

























































