
>>वैश्विक, [email protected]
गेल्या 11 एप्रिलला ‘ब्लॅक होल’च्या ‘फोटो’ने जगाला स्तिमित केलं. त्याच वेळी नॉर्वेमधल्या नयनरम्य ध्रुवीय प्रकाशातील काही निळसर ठिपक्यांनी पुन्हा एकदा ‘उडत्या तबकडय़ां’ची चर्चा सुरू झाली, परंतु तसं कोणतंही ‘गूढ’ अवकाशातून अवतरलं नव्हतं, तर ते ठिपके म्हणजे ‘नासा’ने केलेल्या एका प्रयोगाचा प्रताप होता. नासाच्या दोन रॉकेटनी नॉर्वेच्या समुद्रावर काही भौमितिक प्रकाशझोत टाकून 5 एप्रिलला पृथ्वीच्या उत्तर ध्रुवीय प्रदेशातील ‘पोलर कस्प’चा अभ्यास करण्यासाठी सोडले होते. तेथील भूगर्भातल्या चुंबकीय क्षेत्रामुळे चुंबकीय लहरी वक्र होऊन वातावरणातील प्रकाशाचं रम्य रूप दाखवतात. त्यालाच ध्रुवीय प्रकाश किंवा ‘अरोरा’ म्हणतात.
यानिमित्ताने आपण विश्वाचा एक छोटासा भाग असलेल्या आपल्या पृथ्वीच्या अंतरंगात डोकावण्याची संधी घेऊ. आपण साधी चुंबक सूची (मरीनर्स कम्पास) वापरून पृथ्वीवर चुंबकीय क्षेत्र असल्याचं जाणून घेऊ शकतो. ही चुंबक सूची कायम दक्षिणोत्तर असते. त्यावरून दिशादिग्दर्शन होतं. मात्र आता पृथ्वीचा भौगोलिक उत्तर ध्रुव आणि चुंबकीय ध्रुव यात फरक पडत असल्याने चुंबक सूचीची फसगत करण्याची शक्यता आहे. त्याविषयी आपण ‘होकाला धोका’ या लेखात वाचलंच आहे. पृथ्वीच्या गाभ्यात असलेल्या तप्त रसाच्या हालचालीमुळे हे चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड) निर्माण होतं. चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्याच्या प्रक्रियेला डायनॅमो म्हणतात (याच तत्त्वावर ‘डायनॅमो’ बसवून सायकलचा दिवा लागतो).
पृथ्वीच्या अंतर्भागापासून रचना पाहिली तर अगदी आतला गाभा घट्ट लोखंडाचा आहे. त्यावर द्रवरूप लोखंडाच्या तप्त रसाचा आहे. त्यावर पुन्हा घट्ट दगडी ‘मॅन्टल’ आहे. त्यामुळे हा तप्त लोहरस दोन घट्ट थरांच्या मध्ये कोंडलेला आहे. पृथ्वीचा सर्वात वरचा थर म्हणजे आपण राहतो तो भू-भाग (क्रस्ट). आता पृथ्वीचा काही अंतर्भाग हा द्रवरूप लोहरसाचा असल्याने त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीवर चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं आहे. हा लोहद्रव विद्युतवाही असल्याने त्याच्या हालचालीतून चुंबकीय लहरी तयार होतात (त्यालाच डायनॅमो म्हणतात). पृथ्वीच्या द्रवरूप अंतःस्तरातील द्रव्य थंड होऊन घट्ट बनताना जी ऊर्जा उत्सर्जित करतं, त्यातून चुंबकीय लहरी निर्माण होतात.
अतिशय प्राचीन खडकांच्या रचनेवरून हे लक्षात येतं की, आपल्या ग्रहाचं चुंबकीय क्षेत्र गाभ्यातील द्रवरसाच्या हालचालींमुळेच निर्माण होतं. जेव्हा लोहतत्त्व असलेला ज्वालामुखीचा रस (लाव्हा) थंड होतो आणि त्याचं अग्निजन्य (इग्नस) खडकात रूपांतर होतं तेव्हा ते पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने भारित होतात. पृथ्वीच्या गाभ्यातील या घडामोडींमुळे पृथ्वीचा चुंबकीय ध्रुव स्थिर नसून तो उलटय़ा दिशेने फिरतो. म्हणजे 30 हजार वर्षांपूर्वी चुंबक सूचीने उत्तर दिशा न दाखवता दक्षिण दाखवली असती! आताही त्या बदलाने थोडा थोडा फरक पडतच आहे. पृथ्वीच्या या चुंबकीय क्षेत्राचे परिणाम पार वातावरणाच्या वरच्या थरापर्यंत जाणवतात. या चुंबकीय क्षेत्राची गाठ वातावरणातील वरच्या थरात गेल्यावर सौर वाऱयांशी पडते. सौर वाऱ्यातून अब्जावधी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन अव्याहतपणे येत असतात. हे मूलकण पृथ्वीजवळ सेकंदाला 450 कि.मी. वेगाने किंवा ताशी दहा लाख किलोमीटर वेगाने घोंघावत असतात. एरवी त्यांचा आपल्याला त्रास झाला असता, परंतु पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी टकरल्यामुळे सौर वाऱ्याच्या त्रासापासून आपण मुक्त आहोत. हे सुरक्षा कवच म्हणजे पृथ्वीचं मॅग्नेटोस्फीअर.
पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राने सौरमालेत पसरलेल्या सुपरसॉनिक (स्वनातीत) सौर वाऱयांच्या ‘राज्या’त एक सुरक्षित गुहाच निर्माण केली जाते. या क्षेत्रामुळे त्यांचा सुपरसॉनिक वेग मंदावतो आणि आपलं रक्षण होतं. कधी कधी हे चुंबकीय आवरण (मॅग्नेटोस्फीअर) ओव्हरलोडेड होतं. या अतिभारामुळे काही पार्टिकल चुंबकीय क्षेत्राला भेदून पृथ्वीच्या वातावरणात झेपावतात. तिथे ते भारित कण पृथ्वीच्या वरच्या थरातील अणूंशी टकरतात आणि त्यातून निर्माण झालेला प्रकाश मुख्यत्वे पृथ्वीच्या ध्रुवीय भागात दिसतो. तोच अरोरा किंवा ध्रुवीय प्रकाश. तो पृथ्वीच्या उत्तर-दक्षिण ध्रुव प्रदेशातील देशांमधून दिसून येतो. त्याची तीक्रता अधिक असेल तर क्वचित उत्तरेला युरोपीय देशांतून दिसतो. या ध्रुवीय प्रकाशातून विविध रंगांची बरसात होताना दिसते. उत्तर ध्रुवीय अरोराला नॉर्थन लाइटस् किंवा (अरोरा बोरिऑलिस) आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशातून दिसणाऱ्या अरोराला सदर्न लाइटस् किंवा अरोरा ऑस्ट्रेलिस असं म्हटलं जातं. अनेक हौशी पर्यटक उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय देशांमध्ये असे अरोरा अनुभवायला जातात, परंतु त्याची तीक्रता त्या त्या वेळच्या पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी होणाऱ्या सौर वाऱयांच्या टकरीशी निगडित असते. तीक्र सौर वाऱयांच्या (सोलार विंड) काळात अरोरा अधिक दिसतात.



























































