एमएमआरडीएच्या चालढकलीमुळे रखडले पवईतील आदिवासींचे पुनर्वसन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या रुंदीकरणासाठी हटवण्यात आलेल्या पवईतील आदिवासी पाडय़ांमधील आदिवासींचे अद्याप योग्यरीत्या पुनर्वसन झालेले नाही. या पुनर्वसनासंदर्भात आयआयटी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यात 2007 मध्ये करार झाला होता, परंतु त्या कराराचे एमएमआरडीएने पालन केले नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

जागेच्या बदल्यात नुकसानभरपाईच नाही

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या रुंदीकरण प्रकल्पात पवईच्या आयआयटी मुंबईच्या जागेवरील पेरूबाग आणि भांगशिला आदिवासी पाडे गेले. त्या आदिवासींच्या पुनर्वसनासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आयआयटी मुंबई आणि एमएमआरडीएकडून माहिती मागितली होती. आयआयटीचे सहाय्यक निबंधक एस. एल. धिवर यांनी त्यांना माहिती दिली. या प्रकल्पात आयआयटी मुंबईची 10559 चौरस मीटर जागा गेली. त्याबदल्यात एमएमआरडीएने कोणतीही नुकसानभरपाई दिली नाही. या जागेवर आयआयटीच्या ज्या सेवा होत्या त्या स्थानांतरित करण्यासाठी फक्त 3.16 कोटी रुपये दिले.

आदिवासींचे जीव धोक्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे प्रकरण गेले तेव्हा 2016 मध्ये त्यांनी एमयूटीपी धोरणांतर्गत या आदिवासी पाडय़ांचे पुनर्वसन करण्याचे आदेश एमएमआरडीए प्रशासनाला दिले होते, परंतु एमएमआरडीएने त्यावर वेगाने कार्यवाही केली नाही. दरम्यान, पेरूबाग परिसरात हिंस्र श्वापदांचा वावर वाढून आदिवासींच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गलगली यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून आदिवासी पाडय़ांतील आदिवासींचे पुनर्वसन नाहूर किंवा कांजुरमार्ग येथील वसाहतींमध्ये करण्याची मागणीही केली आहे.

एमएमआरडीएच जबाबदार – आयआयटी

एमएमआरडीए प्रशासनाने 2011 मध्ये तेथील 99 झोपडय़ांचे स्थलांतर केले. घाटकोपर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाने 2013 मध्ये पेरूबाग आणि भांगशिला येथील झोपडय़ांचे सर्वेक्षण करून 433 झोपडय़ांची नोंद केली होती. या झोपडीवासीयांच्या पुनर्वसनासाठी आयआयटीने पुढाकार घेतला आहे. कारण पुनर्वसन होणार म्हणून या झोपडीवासीयांना सरकारकडूनही सुविधा पुरवल्या जात नाहीत असे वास्तव आहे. गेली 12 वर्षे आदिवासींचे पुनर्वसन रखडण्यास एमएमआरडीए जबाबदार असल्याचे आयआयटी प्रशासनाचे म्हणणे असल्याचे गलगली सांगतात.