वसई रेल्वे स्थानकात थरार; पादचारी पुलावर तरुणाकडून प्रवाशावर प्राणघातक हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वसई

वसई रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर एका अज्ञात माथेफिरूने धारदार शस्त्राने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एक प्रवासी गंभीर जखमी झाला. हल्ला नेमका का झाला ते समजू शकले नाही. ऐन गर्दीच्या वेळी माथेफिरूकडून असा हल्ला घडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

वसईत राहणारे समीर मर्चंट (52) संध्याकाळी कामानिमित्त चर्चगेटला जात होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास ते वसई स्थानकात आले आणि पादचारी पुलावरून फलाट क्रमांक 3 वर जात होते. त्याचवेळी अचानक एका अज्ञात इसमाने त्यांना अडवले आणि त्यांच्यावर टोच्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या अनपेक्षित हल्ल्याने मर्चंट भांबावले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर त्यांच्यावर हल्ला करत राहिला. या हल्ल्याने मर्चंट खाली कोसळले. त्यांच्या छातीवर, खाद्याला दुखापत झाली आहे. हल्लेखोर तरुणाने हल्ल्यासाठी वापरलेला टोचा मर्चंट यांच्या हातात खुपसला होता. अवघ्या काही क्षणांत हल्लेखोर पसार झाला. मर्चंट यांना उपचारासाठी वसईच्या कृष्णा या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शस्त्रक्रिया करून त्यांच्या हातात खुपसलेला टोचा काढण्यात आला आहे. मर्चंट यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आम्ही अज्ञात हल्लेखोराविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती रेल्वेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांनी दिली. हल्लेखोर नेमका कोण होता, त्याचा उद्देश काय होता त्याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रण मिळाले  त्यात हल्लेखोर हल्ला करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मर्चंट यांनी माझे कुणाशी वैर नाही, त्याने माझ्यावर हल्ला का केला ते माहीत नाही असे पोलिसांना सांगितले. ऐन गर्दीच्या वेळी असा हल्ला झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.