
सामना प्रतिनिधी । हिंगोली
सेनगाव शहरातील मारोती मंदिराच्या पाठीमागच्या बाजुला एका शेतात विहीरीचे खोदकाम सुरु असतांना क्रेन पलटी झाल्यामुळे झालेल्या अपघातात कामावरील मजुरदार पतीचा मृत्यू तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सेनगाव शहरातील एका शेतकऱ्याच्या शेतात विहीरीचे खोदकाम सुरु होते. क्रेनसह काही मजदुरही या कामावर कार्यरत होते. सकाळी 11 वाजता क्रेनव्दारे दगड काढण्याचे काम सुरु होते. दगड वर आणतांना क्रेनचा रॉड तुटल्यामुळे ती पलटी झाली. यामध्ये जिंतुर तालुक्यातील वसा येथील सुभाष सुर्यवंशी (35) यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर फुलाबाई सुभाष सुर्यवंशी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती समजल्यावर ग्रामस्थ व शेतकऱ्यानी जखमीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.





























































