
>> शेफ विष्णू मनोहर
सुनिला करंबेळकरबरोबर शाकाहारी मैफल म्हणजे मोठाच आनंद. अनेक शाकाहारी पदार्थांची बहार!
सुनीला करंबळेकर…काही मराठी मालिका आणि त्यानंतर हिंदीतच काम करू लागली. कारण तिचे व्यक्तिमत्त्व हिंदीला साजेसं. गप्पा मारण्यासाठी ती माझ्या सेटवरच आली. स्टुडियोत फक्त बसण्यापेक्षा काहीतरी रेसिपी करूया असं ठरवलं. त्याप्रमाणे तिने एक रेसिपी केली आणि आम्ही दुपारी 2 वाजता जेवायला बसलो.
शूटिंगमध्ये जे जेवण येतं ते मलाही आणि सुनीलालाही आवडत नाही. कारण ती संपूर्ण शाकाहारी आहे. तिच्याकडे बघून ती शाकाहारी आहे, असं वाटत नाही तो भाग वेगळा. तिला वेगवेगळ्या भाज्या भरपूर आवडतात. सलाडचे वेगवेगळे ड्रेसिंग ती स्वतः करते आणि मध्यंतरी असे सलाड ड्रेसिंग तयार करून ऑनलाइन विकलेही. दुसरी एक गोष्ट तिच्यासाठी बोलताना जाणवली की, ती फक्त अभिनेत्री आहे असं नाही. कसं असतं कलाकाराचं ग्लॅमर काही दिवस असतं. नंतर त्यांना दुसरं काहीतरी कमाईचं साधन हवं असतं. त्यासाठी ती पहिल्यापासून काहीतरी दुसरा व्यवसाय शोधत होती. जे अभिनयाव्यतिरिक्त असेल. ती मला म्हणाली आपण साम टीव्हीसाठी सिरियल प्रोडय़ुस करू. तेव्हा ई टीव्हीसाठी मेजवानी किचन हा कार्यक्रम करायचो, पण सुनीलाने मात्र व्हॅनिटी व्हॅन विकत घेतल्या त्या ती भाडय़ाने द्यायची. तिला तेलकट पदार्थ आवडत नाहीत. एकदा असा प्रसंग घडला. ग्रीसमध्ये तिचं कुठल्यातरी सिनेमाचं चित्रीकरण होतं. ग्रीस हा देश शंभर टक्के मांसाहारी. त्यामुळे तिने सांगितलं होतं मला शाकाहारी पदार्थ लागतील. ते हो म्हणाले आणि व्हेज म्हणून तिच्या पुढय़ात मासा आणून ठेवला. व्हेज म्हणजे आमच्याकडे मासा असतो, असं त्यांचं म्हणणं होतं. तो मासा असा बनवला होता खायला सुरुवात केल्यावर या पदार्थात काहीतरी गडबड आहे, हे तिच्या लक्षात आलं. तेव्हा तिने ते जेवण टाकलं. पंधरा दिवस चित्रीकरण चाललं. त्या दिवसांत ती पूर्णपणे फळांवर होती. या दिवसात तिचं दहा किलो वजन कमी झालं, ही गंमत आहे.
ज्या दिवशी शूटिंग नसेल त्या दिवशी घरी स्वयंपाक करायला आवडतो. ती स्वतः घरी स्वयंपाक करून लोकांना जेवायला बोलवते. स्वयंपाक बनवणं हे मानसिक ताणतणाव कमी करण्याचं काम करतं त्यामुळे मला रिलॅक्स वाटतं. घरी वरण-भात, पोळी, एकदोन भाज्या करते. भाज्या सगळ्यात शेवटी करते जेणेकरून त्या फ्रेश तयार झालेल्या भाज्या पानात आल्या पाहिजेत. तिला गोड आवडत नाही. जेवणानंतर दहाच्या आत गाणी ऐकत झोपणे असा माझा दिनक्रम आहे, असं ती सांगते. सध्या ती स्वतःची तेलघाणी सुरू करतेय. घाणीचं तेल पौष्टिक असतं. त्यामुळे ती अहमदाबादमध्ये तेलघाणी सुरू करत असून वेगवेगळ्या प्रकारची तेलं ती या घाणीतून काढणार आहे.
हातफोडणीचा भात

साधारणतः फोडणीचा भात आपण गरम करतो. त्याऐवजी थंड भाताला पाणी शिंपडून मोकळा करायचा. त्याला हिंग, मोहरी, हळद, लिंबू, मीठाची फोडणी वरून द्यायची. हाताने कालवायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोणत्याही पापडाबरोबर खायचा.
सलाड

नेहमीच्या वापरातलं वनस्पती तेल, सॅलडाईल ऑईल असेल तर उत्तम. तेल चार चमचे, त्यामध्ये चार चमचे लिंबाचा रस , साखर एक चमचा, चवीनुसार मीठ, मोहरी भरडून घालायची. हे सर्व छान एकत्र करून त्यामध्ये मिक्स हर्ब घालायचे. नंतर हे सगळं ड्रेसिंग टोफू, पानकोबी, द्राक्ष, बदाम यावर घालायचं. हे सॅलड असं असतं की, यासोबत ब्राऊन ब्रेड खाल्ला तर एक वेळचं जेवण होतं.
आमटी

तुरीच्या डाळीचं वरण यामध्ये गोडा मसाला. तो घरी बनवण्यासाठी अर्धा चमचा हिरव्या वेलचीचे दाणे, एक इंच दालचिनी, एक पान तमालपत्र, एक स्टारफूल, जायपत्री हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करायचं. हा झाला गोडा मसाला. वरण बनवताना तुरीची डाळ शिजवून घ्यायची. शिजवताना त्यामध्ये हिंग, हळद आणि मीठ घालायचं. फोडणी देताना कढीपत्ता, हिंग, मोहरी शिवाय फोडणीमध्येच कोथिंबीर घालायची. डाळीला फोडणी द्यायची. वरून हळद घालायची. जेणेकरून हळदीचा रंग बदलणार नाही. चवीनुसार तिखट आणि तयार केलेला गोडा मसाला अर्धा चमचा घालायचा. नंतर चवीनुसार गूळ,चिंचेचा कोळ, मीठ घालायचं. छानशी उकळी येऊ द्यायची.



























































