।। श्री शंकरगाथा ।।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

                                                 सोलापूर येथे आगमन

श्रीस्वामीसमर्थांचे सोलापूर येथील आगमन ज्या जुन्या दत्तमंदिरात झाले, त्या मंदिराशेजारी संतकवी श्रीशुभराय महाराजांचे समाधिस्थळ आहे. ही वास्तू ‘श्रीशुभराय मठ’ म्हणून ओळखण्यात येते. श्रीशुभराय पूर्वी टिपू सुलतानाच्या दरबारात होते, मात्र टिपूच्या धर्मांध व बेताल राजवटीला तसेच तेथील अनागोंदी कारभाराला कंटाळून ते महाराष्ट्रात आले आणि सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरानजीकच्या तलावाजवळील दक्षिण कसबा परिसरात अखेरपावेतो वास्तव्य करते झाले. संतवृत्तीचे श्रीशुभराय हे उत्तम कवी अन् चित्रकारदेखील होते. त्यांचा अध्यात्माकडे असलेला कल व उपजत संतवृत्ती यांमुळे परिसरातील अनेक भक्तमंडळी त्यांच्या कीर्तनास येत असत. श्रीशुभरायांना एका विलक्षण लीलाप्रसंगातून प्राप्त झालेल्या विठ्ठलाच्या वालुकामय मूर्तीचे दर्शन घेण्यासही अनेक भक्तांची गर्दी जमत असे.

श्रीशुभराय महाराजांच्या नित्य दर्शनभेटीस येणाऱया तसेच त्यांच्या सेवेकरिता तत्पर असणाऱया रावजीबुवा यांच्याकडे पुढे श्रीशुभराय मठाची धुरा आली. रावजीबुवांचे उत्तराधिकारी व श्रीशुभराय मठाचे तत्कालीन मठाधिपती जनार्दनबुवा हे देखील निस्सीम भगवद्भक्त होते. त्यांच्या मातोश्रींचा जन्म श्रीस्वामीसमर्थांच्या कृपाप्रसादाने झाला होता. श्रीस्वामीसमर्थांचे सोलापूर येथे वास्तव्य झाले त्यावेळी श्रीदत्तमंदिर, गणपती घाट तसेच श्रीशुभराय मठ या दक्षिण कसबा परिसरातील वास्तूंमध्ये ते अनेकदा येत व निवांतपणे बसून राहात.

‘बुवा’कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते. जनार्दनबुवा आणि त्यांच्या मातोश्री यांच्या प्रेमळ आणि लाघवी स्वभावामुळे आसपासच्या परिसरातील अनेक भक्तमंडळींचा श्रीशुभराय मठामध्ये नित्य राबता असे. जनार्दनबुवांना प्रेमाने जनुबुवा म्हणत असत. श्रीशुभराय मठाच्या सभामंडपात भजन, संगीत व गायन करण्यामध्ये रममाण झालेले जनुबुवा अनेकदा भावावस्थेमध्ये दंग होत असत. देहभान हरपून जाण्याची त्यांची ही सवय समस्त सोलापूरकरांच्या नित्य परिचयाची होती. एकदा, जनार्दनबुवा त्यांच्याच विश्वात दंग होऊन खडय़ा आवाजात ‘शंकरा’ राग आळवीत असताना एकाएकी श्रीशुभराय मठाच्या दरवाजात श्रीशंकर महाराज येऊन उभे ठाकले आणि मोठय़ांदा ‘अल्लख’ असे म्हणाले.

भजनात तल्लीन झालेल्या जनार्दनबुवा अर्थात जनुबुवांच्या कानावर ‘अल्लख’चा जबरदस्त पुकारा कानी आला. त्यासरशी त्यांचे भजन तिथल्या तिथे थांबले. अनपेक्षितरीत्या कानावर आलेल्या ‘अल्लख’च्या पुकाऱयामुळे जनुबुवांनी श्रीशुभराय मठाच्या प्रवेशद्वारापाशी चमकून पाहिले, तेव्हा त्यांना विक्षिप्त भासणारी लहानखुरी व्यक्ती दिसली. त्या वामनमूर्तीकडे पाहात असतांना एकाएकी बुवांना त्या व्यक्तीच्या ठायी ‘तीन शिरे, सहा हात’ या स्वरूपातील श्रीदत्तात्रेयांचे अद्भुत तेजस्वी दर्शन घडले. अवधूत दत्तदिगंबराचे ते काषायवस्त्र ल्यायलेले मोहक, मनोहर रूप पाहून जनार्दनबुवा भावावस्थेत पोहोचले. अष्टसात्त्विक भाव जागृत झाल्यामुळे बुवांना समाधीवस्था प्राप्त झाली. श्रीदत्तदर्शनाचा हा दिव्य अलौकिक अनुभव बराच काळ अनुभवल्यावर बुवा भानावर आले आणि मठाच्या प्रवेशद्वारापाशी उभ्या ठाकलेल्या त्या विक्षिप्त भासणाऱया व्यक्तीच्या चरणांवर साष्टांग नमस्कार घालते झाले.

जनार्दनबुवांनी श्रीशंकर महाराजांचा हात धरून त्यांना श्रीशुभराय मठाच्या वास्तूमध्ये सन्मानपूर्वक आणले. श्रीमहाराजांचा तेथे बराच काळ मुक्काम घडला. दरम्यान, श्रीमहाराजांनी जनुबुवांना अनेक अलौकिक अनुभव प्राप्त करवून दिले, याकारणाने जनुबुवांचा श्रीमहाराजांविषयी असलेला आदर आणि प्रेमानुभव विलक्षण वेगाने वाढता झाला. त्यांची श्रीमहाराजांविषयीची भक्ती अल्पावधीतच दृढ व स्थिर झाली.

श्रीमहाराजांच्या दिव्य अनुभूतीचे जागते अनुभव तसेच त्यांच्यातील देवत्त्वाच्या प्रचीतीचा ‘साक्षात’ प्रत्यय येत गेल्याने सोलापुरातील बरीचशी मंडळी श्रीमहाराजांच्या दर्शनास नित्यनेमाने येऊ लागली. श्रीमहाराजांची दर्शनभेट घेण्यामुळे कृतार्थ झाल्याचा अनुभव प्राप्त करती झाली. श्रीशुभराय मठामध्ये श्रीशंकरभक्तांची गर्दी दिसामासाने वाढती झाली आणि कालांतराने पुढे ओसंडून वाहू लागली.