
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
इशांत शर्मा, अमित मिश्रा, ट्रेंट बोल्ट यांची प्रभावी गोलंदाजी आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमधला साखळी फेरीतील अखेरचा सामना अगदी आरामात जिंकला. दिल्ली कॅपिटल्सने साखळी फेरीत नवव्या विजयासह 18 गुणांची कमाई केली. अजिंक्य रहाणेच्या राजस्थान रॉयल्सला आठ पराभवांनिशी स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.
सुमार फलंदाजी
दरम्यान, याआधी राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टीवन स्मिथच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले, मात्र संघातील एकाही फलंदाजांना आपली चुणूक दाखवता आली नाही. अजिंक्य रहाणे (2 धावा), लियाम लिव्हिंगस्टोन (14 धावा), संजू सॅमसन (5 धावा), महिपाल लोमरोर (8 धावा) व श्रेयस गोपाल (12) यांना अपयशाला सामोरे जावे लागले. इशांत शर्माने राजस्थान रॉयल्सच्या प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
परागचे अर्धशतक पण…
राजस्थान रॉयल्सचा डाव गडगडत असताना रियान परागने 49 चेंडूंत 2 षटकार व 4 चौकारांसह 50 धावांची खेळी साकारली. त्याच्या दमदार फलंदाजीमुळेच राजस्थान रॉयल्सला 9 बाद 115 धावा करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून इशांत शर्माने 38 धावा देत 3 आणि लेगस्पिनर अमित मिश्राने 17 धावा देत 3 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने 27 धावा देत 2 फलंदाज बाद केले.
पंतचा धमाका
स्टार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर युवा फलंदाज रिषभ पंतने 38 चेंडूंत 5 सणसणीत षटकार व 2 चौकारांसह नाबाद 53 धावा फटकावल्या व दिल्ली कॅपिटल्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राजस्थान रॉयल्सकडून इश सोढीने 26 धावा देत 3 आणि श्रेयस गोपालने 21 धावा देत 2 फलंदाज बाद केले.
टॉपचे फलंदाज अपयशी
राजस्थान रॉयल्सकडून मिळालेल्या 116 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करणाऱया दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात निराशाजनक झाली. लेगस्पिनर इश सोढीने शिखर धवन (16 धावा) व पृथ्वी शॉ (8 धावा) या सलामीवीरांना झटपट तंबूत पाठवले. श्रेयस गोपालने कर्णधार श्रेयस अय्यरला 15 धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला.
आजच्या लढती
चेन्नई सुपरकिंग्ज वि. किंग्स इलेव्हन पंजाब
चंदिगड, सायंकाळी 4 वाजता
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स
मुंबई, सायंकाळी 4 वाजता






















































