
सामना ऑनलाईन। भुवनेश्वर
‘फनी’ वादळाचा जबरदस्त तडाखा बसल्यामुळे तीर्थक्षेत्र जगन्नाथपुरी जलमय झाले. मुसळधार पावसामुळे शहराची दैना उडाली. मात्र, प्रशासनाने ‘फनी’शी मुकाबला करण्यासाठी अतिशय व्यवस्थित नियोजन केल्यामुळे जीवितहानी झाली नाही.
हवामान खात्याचा अचूक अंदाज, आपत्कालीन धोरणाचा जबरदस्त ताळमेळ बसवून 45 हजार कर्मचाऱयांनी अवघ्या 24 तासांत तब्बल 12 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. एकाप्रकारे या लोकांचे प्राणच वाचवले! अत्यंत भयंकर रूप धारण करून दक्षिण किनारपट्टीवर चालून आलेल्या ‘फनी’ चक्रीवादळाचे आक्रमण हिंदुस्थानने परतवून लावले. हिंदुस्थानच्या या कर्तबगारीचे संयुक्त राष्ट्रांनीही जोरदार कौतुक केले आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे भयंकर चक्रीवादळात रूपांतर झाले. वायूवेगाने हे चक्रीवादळ हिंदुस्थानच्या दक्षिण किनारपट्टीकडे झेपावले. शुक्रवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘फनी’ने धडक मारली. भगवान जगन्नाथाच्या पुरीमध्ये या वादळाने हाहाकार माजवला. मुसळधार पावसामुळे पुरीसह आसपासचा परिसर जलमय झाला.
सतर्क प्रशासन, अखंड काम
‘फनी’ चक्रीवादळाचा ओडिशाला सर्वाधिक झटका बसणार होता. राज्यातील 15 जिल्हे या वादळाच्या पडछायेखाली आले होते. किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित कसे हलवायचे असा प्रश्न सरकारसमोर होता. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. कामकाजाचे वाटप झाले. 24 तासांत 12 लाख लोकांना सुरक्षित हलवण्याची जबाबदारी 45 हजार कर्मचाऱयांवर टाकण्यात आली. त्यांच्या मदतीला 45 हजार मदतनीस देण्यात आले.
मदत छावण्या, स्वयंपाकघरे
हवामान खात्याने ‘फनी’च्या विध्वंसक क्षमतेची जाणीव करून दिल्यानंतर सर्वात प्रथम तातडीने 9000 मदत छावण्या उभारण्यात आल्या. शाळा-कॉलेज ताब्यात घेऊन तेथे सात हजार स्वयंपाकघरे उभारण्यात आली. त्यानंतर बुधवारी सायंकाळपासून गुरुवारी सायंकाळपर्यंत तब्बल 12 लाख लोकांना छावण्यांमध्ये हलवण्यात आले. एवढेच नाही तर 26 लाख लोकांना एसएमएस करून धोक्याचा इशारा देण्यात आला. आयआयटी खरगपूर यांच्याकडून आपत्कालीन धोरणविषयक सल्ला घेण्यात आला.
ही कर्तबगारी कौतुकास्पदच
हवामान खात्याने दिलेला ‘फनी’चा अचूक अंदाज, आपत्कालीन धोरण आणि प्रशासकीय यंत्रणेचा बेजोड ताळमेळ यामुळे हिंदुस्थानला ओडिशात 12 लाख लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले, असे कौतुक संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन विभागाचे प्रवक्ता डेनिस मॅक्लिन यांनी केले. अत्यंत कमी वेळेत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून हिंदुस्थानने केलेले काम अफाट असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे विशेष प्रतिनिधी मामी मिजुतोरी यांनी म्हटले आहे.
इंडियन ऑइलकडून इंधनपुरवठा आणि मदत
‘फनी’ वादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील किनारी भागात प्रचंड नुकसान झाले. या भागात इंडियन ऑइलकडून इंधनपुरवठा करण्यात आला. दोन्ही राज्यांत इंधनाची कमतरता भासू नये यासाठी कंपनीने शक्य ती काळजी घेतली असून पेट्रोल, डिझेल, एलपीजी, केरोसीन आणि विमान इंधनाचा पुरेसा साठा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यावर कंपनीने भर दिला आहे. याशिवाय मदत आणि बचावकार्यातही कंपनीच्या व्यवस्थापनाने जिल्हा व्यवस्थापनाशी संपर्क साधून सहभाग घेतल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
300 बोटी, अखंड सायरन
‘फनी’चा मुकाबला करण्यासाठी आपत्कालीन विभागाच्या एक हजार प्रशिक्षित कर्मचाऱयांना धोक्याच्या ठिकाणी पाठवण्यात आले. किनारपट्टीवर 300 उच्च क्षमतेच्या बोटी सज्ज ठेवण्यात आल्या. टीव्ही, सायरन तसेच पोलीस याशिवाय लोकांपर्यंत पोहोचणाऱया प्रत्येक साधनाचा वापर करून धोक्याचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे, ओडिशी भाषेतूनच हा संदेश देण्यात आल्यामुळे तो सर्वसामान्यांपर्यंत लगेच पोहोचला.
1999 मध्ये घेतला होता 10 हजार लोकांचा बळी
29 ऑक्टोबर 1999 रोजी ओडिशात आलेल्या भयंकर चक्रीवादळात प्रचंड जीवितहानी झाली होती. तब्बल दहा हजार लोकांचा मृत्यू झाला होता. वीस वर्षांनी शुक्रवारी घडलेल्या ‘फनी’ चक्रीवादळात प्रचंड आर्थिक नुकसान झाले. 12 जणांचा मृत्यू झाला. ओडिशा सरकारने युद्धपातळीवर केलेल्या उपाययोजनेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.




























































