
सामना ऑनलाईन । नाशिक
नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये दरोडेखोर आणि नागरिकांमध्ये शनिवारी रात्री तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एका दरोडेखोराचा मृत्यू झाला असून 4 दरोडेखोर पसार झाले आहेत. तर दरोडेखारांच्या हल्ल्यात 5 नागरीक जखमी झाले आहेत.
चांदवडच्या खैसवाडा परिसरात शनिवारी रात्री 10 वाजल्याच्या सुमारास दरोडेखोरांनी मोरे यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मोरे कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. यावेळी बिथरलेल्या दरोडेखोरांनी मोरे कुटुंबीयांवर हल्ला केला. त्यामुळे नागरिकांनी देखील त्याला जोरदार प्रत्यूत्तर देताच दरोडेखोर आणि ग्रामस्थांमध्ये तूफान हाणामारी सुरु झाली. या हाणामारीत एका दरोडेखोराचा मृत्यू झाला असून चार चोरटे पसार झाले आहेत. तर 5 ग्रामस्थ देखील या हाणामारीत जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानीक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी चांदवड पोलीस अधिक तपास करत आहेत.



























































