
सामना ऑनलाईन । धुळे
धुळ्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर चक्कर येऊन पडल्याने निवडणूक कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भुतेसिंग देवरे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून 29 एप्रिल रोजी मतदान केंद्रावर चक्कर येऊन ते जमीनीवर कोसळले होते. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
धुळे तालुक्यातील नाणे येथील ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई भुतेसिंग देवरे हे मतदानाच्या दिवशी नाणे येथील मतदान केंद्रावर इलेक्शन ड्युटीवर होते. त्यावेळी त्यांना चक्कर येऊन ते खाली कोसळले, त्यांना तत्काळ धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर पुछिल उपचारासाठी त्यांना धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना देवरे यांचा शनिवारी मृत्यू झाला. देवरे यांच्या मृत्यू प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





























































