
सामना प्रतिनिधी, सटाणा
दि. 5 (सा.वा.) – अत्यल्प पावसामुळे या वर्षी मार्च महिन्यापासून पिण्याच्या पाण्याबरोबरच चाराटंचाईच्या झळा मोठय़ा प्रमाणावर बसू लागल्या असल्यामुळे शेतकऱयांच्या चिंतेत मोठय़ा प्रमाणावर भर पडली आहे. जानेवारी महिन्यातच विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकऱयांना जनावरांसाठी चारा तयार करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आता चाऱयाअभावी महागडी जनावरे कशी जतन करावीत, असा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे.
पूर्वी शेतात मोठमोठे बांध, नालाबांध होते. त्यामुळे पावसाळय़ात पावसाचे पडणारे पाणी या बांध, नालाबांधमघ्ये साचून राहत असे. ते पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे विहिरींना पाणी मुबलक होते. तसेच शिवारात विहिरीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे विहिरींनाही पाणी मोठय़ा प्रमाणात होते. परंतु आता परिस्थिती अगदी उलट आहे. विज्ञान युगामध्ये शेती सपाट करण्यासाठी ट्रक्टर, जेसीबी आदी यंत्र विकसित झाल्याने जिरायती शेती बागायती केली. त्यामुळे विहिरींच्या संख्येत वाढ झाल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा कमी झाला. तसेच ही जिरायती शेती बागायती करताना जी जिरायती शेतीतील झाडी होती ती काढली गेली, परंतु त्या जागेवर नवीन झाडी लावली गेली नाहीत.
शेतात जे मोठेमोठे नालाबांध होते ते ते जमीन सपाट झाल्याने पावसाळ्यात डोंगरावर पडणाऱया पावसाचे पाणी कुठेही न अडवता ते नदीला वाहून जाते. त्यामुळे ते जमिनीत मुरत नसल्याने जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होत नाही. झाडे कमी झाल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी कमी हहोत आहे. चालू वर्षी सुरुवातीपासून पावसाची वक्रदृष्टी होती. या अल्पशा पावसावर खरीपाची पिके आली, परंतु परतीचा व बेमोसमी पाऊस आला नसल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीत वाढ झाली नाही.
दरवर्षी साधारण मे महिन्यापासून उन्हाळा जाणवत असे. परंतु या वर्षी मार्च महिन्यापासून भीषण उन्हाळा जाणवू लागला आहे. आतापासून अनेक ठिकाणी पिण्याचा पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक गावामघ्ये आठ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत आहे, तर काही ठिकाणी महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावी लागत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱयाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
जानेवारी महिन्यातच विहिरींनी तळ गाठला
दरवर्षी शेतकरी जानेवारी महिन्यात जनावरांसाठी मका किंवा ज्वारीची पेरणी चाऱयासाठी करत असे. त्यामुळे हा चारा मे महिन्यामध्ये जनावरांना चाऱयासाठी कापणीस येत असे. परंतु परतीचा पाऊस न पडल्यामुळे विहिरींना पाणी उतरले नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यातच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने जनावरांसाठी चारा करता आला नाही.





























































