
सामना प्रतिनिधी । वडवळ नागनाथ
चाकूर तालुक्यातील गावागावात पाणी टंचाई निर्माण झाली असून घरणी मध्यम प्रकल्पातील पाण्याचा मोटारीने अवैद्य उपसा तलावा शेजारील शेतकरी करीत आहेत. परिणामी तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन भविष्यात कृत्रिम पाणी टंचाई भेडसावणार असल्याचे सविस्तर वृत्त ऑनलाईन सामना मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाच्या एका पथकाने तलावातील पाणीसाठा उपसा करणाऱ्या बेचाळीस अवैद्य मोटारी जप्त करून तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे.
घरणी मध्यम प्रकल्पातून चाकूर तालुक्यातील सतरा खेडी आणि नऊ खेडी पाणीपुरवठा योजना तसेच इतर काही गावे मिळून साधारणतः तीस गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चालू आहे. यंदा उष्णतेच्या तिवृतेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. याशिवाय तलाव परिसरातील शेतकरी हे तलावातील पाणी उपसा मोठ्या प्रमाणावर करीत असल्याने येणाऱ्या काळात पिण्यासाठी पाणी कमी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, तलावातील पाणीसाठा टिकून राहण्यासाठी उपलब्ध असलेले पाणी संरक्षित करण्याची गरज असल्याचे निवेदन संबधित प्रशासनास आटोळा, लातूररोड, घरणी, नळेगाव, वडवळ नागनाथ, उजळंब, नागेशवाडी, अजन्सोंडा, मोहनाळ, कडमुळी येथील सरपंचानी शनिवारी दिले होते.
याबाबत चाकूरचे तहसीलदार अरविंद नर्सिकर यांनी तातडीने एका पथकाची नेमणूक केली. यात नळेगावचे मंडळ अधिकारी ए.आर.जगताप, तलाठी ए.एन.पवार, कोतवाल सदाशिव क्षीरसागर, ग्रामविकास अधिकारी अमित रोकडे, ग्रामपंचायत कर्मचारी माधव आलमले, विजय शेलार, लाईनमन मुरलीधर शेळके, एम.डी.डांगे, श्री.टेकाळे यांच्या पथकाने आज सोमवारी दुपार नंतर धडाकेबाज कारवाई करून तलावातील पच्छीम बाजुच्या अवैद्य पाणी उपसा करणाऱ्या 20 मोटारी व इतर बाजुच्या 22 मोटारी अशा एकूण 42 मोटारी, पाईप, वायर जप्त करून ताब्यात घेतले असुन ते नळेगाव ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात आले आहे; तर घरणी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित केला आहे.
































































