फायर एनओसी नसलेल्या ठाण्यातील 15 रुग्णालय सील, प्रशासनाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी, ठाणे

अग्निसुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱया ठाण्यातील 15 खासगी रुग्णालयांवर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईचा हातोडा मारला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जागे होत अग्निशमन दल व अन्य खात्यांच्या अधिकाऱयांनी फायर एनओसी न घेतलेल्या 15 खासगी रुग्णालयांना आज थेट सीलच ठोकले. त्यानंतर या रुग्णालयांमधील रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून कारवाईच्या या बुस्टर ‘इंजेक्शन’मुळे खासगी रुग्णालय चालकांचे धाबे दणाणले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला भीषण आग लागून आठजणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिका क्षेत्रातील 183 रुग्णालयांनी फायर एनओसी घेतली, मात्र वारंवार सांगूनही 70 रुग्णालयांनी ही एनओसी घेतली नाही. अखेर माहिती अधिकार कार्यकर्ते सपन श्रीवास्तव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ठाण्यातील 50 टक्के खासगी रुग्णालयांनी सुरक्षेकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्य न्यायमूर्ती प्रदीप ओक यांनी रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स, कर्मचारी यांची सुरक्षा महत्त्वाची असून याबाबतचे नियम न पाळणाऱया 70 रुग्णालयांना थेट टाळे ठोका असे आदेश गेल्या महिन्यात दिले होते. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याची गंभीर दखल घेऊन सर्व रुग्णालयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱयांना दिले. मंगळवारी पालिकेचा शहर विकास विभाग, आरोग्य, अतिक्रमण तसेच अग्निशमन खात्याच्या प्रमुखांनी पालिका क्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालयांना भेटी दिल्या. तेथील सुरक्षेची अवस्था बघितल्यानंतर आज तातडीने 15 रुग्णालयांना सील ठोकले.

रुग्णांच्या जीविताशी खेळू देणार नाही
आज केलेल्या कारवाईत वागळेतील पाच, बाळकुममधील तीन तर नौपाडा भागातील तीन खासगी रुग्णालयांना सील ठोकण्यात आले. मुंब्य्रातही चार रुग्णालये बंद केली असून त्यात सुकुर, ओंकार, प्रगती, प्रथमेश या रुग्णालयांचा समावेश आहे. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांच्या जीविताशी खेळू देणार नसून यापुढेही कडक कारवाई करू असा इशारा अग्निशमन विभागाचे अधिकारी शशिकांत काळे यांनी दिला.