दीदींनी मारलेली थप्पडही माझ्यासाठी आशीर्वादच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुरुलिया

पंतप्रधान मोदींना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते असे वक्तव्य करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ममतादीदींनी मारलेली थप्पडही माझ्यासाठी आशीर्वादच आहे, असे सांगत चिटफंडच्या नावाखाली गोरगरीबांच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्या घोटाळेबाजांनाही ममतादीदींनी अशीच थप्पड मारली असती तर बरे झाले असते. आज ममतादीदींनी इतके घाबरावे लागले नसते,असा चिमटाही मोदी यांनी काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.

दीदींना फक्त स्वतःच्या खुर्चीची चिंता

पश्चिम बंगालमध्ये मोदींविरोधात काहीच नसल्याने ममतादीदींचा मोदींवर राग आहे, पण त्या माझा राग जनतेवर काढत असून हा जनतेवर अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले. ममतादींदीनी सत्तेपायी पश्चिम बंगालला उद्ध्वस्त केले. आता सत्ता जाणार या भीतीपोटी त्या राज्याचे आणखी नुकसान करीत आहेत. ममतादीदींना  फक्त स्वतःची खुर्ची, पुतण्या आणि समर्थकांची चिंता आहे, असा आरोपही मोदींनी केला.

आरोप सिद्ध करा किंवा 100 उठाबशा काढा – ममता बॅनर्जी

माझ्या विरोधात केलेले सर्व आरोप सिद्ध करून दाखवा अन्यथा कान धरून 100 उठाबशा काढा असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. पश्चिम बंगालमधील बांकुरा येथील एका प्रचारसभेत त्या बोलत होत्या. पश्चिम बंगालमधील एका सभेत मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचे कोळसामाफियांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. यावर ममता यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्या एकाही उमेदवाराचा कोळसामाफियांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले तर मी माझ्या सर्वच्या सर्व 42 जागांवरील उमेदवार मागे घेईन, मात्र आरोप सिद्ध झाले नाहीत तर मोदींना कान धरून 100 उठाबशा काढाव्या लागतील, असेही ममता यांनी म्हटले आहे.