
सामना प्रतिनिधी । कर्जत
चालत्या ट्रेनमधून विवाहित महिलेला खाली उतरवून पळवून नेऊन बलात्कार करणाऱ्या 3 नाराधमांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सूरज अमरदिप चव्हाण, (रा. भिसेगाव), अजय प्रताप राठोड (रा.क्रांती नगर झोपडपट्टी), बबलू अशोक सिंग (रा. पुलाची वाडी – किरवली) असून त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
10 मे रोजी रात्री 10.40 च्या खोपोली ट्रेनने कर्जत वरून ती महिला व तिचा पती हे खोपोलीला जायला निघाले. कर्जत क्रांती नगर झोपडपट्टीत राहणारा आरोपी सूरज व त्याचा जोडीदार चालत्या ट्रेनमध्ये ती महिला ज्या डब्ब्यात बसली होती त्या डब्ब्यात ते चढले. ट्रेन सुरू झाल्यावर सूरज व त्याच्या जोडीदाराने पीडितेच्या पतीला मारहाण केली. दरम्यान पळसदरी रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबली असता त्या दोघांनी पीडितेला फलाटावर ढकलून दिले. त्यावेळी सूरज उतरला मात्र त्याच्या जोडीदाराने पीडितेच्या पतीला फलाटावर उतरण्यास मज्जाव केला. ट्रेन सुरू झाल्यावर दुसऱ्या साथीदाराने चालत्या ट्रेनमधून उडी घेतली.
पळसदरी रेल्वे स्थानकातून त्या महिलेला आरोपींनी हाताला धरून खेचत बाहेर नेले. रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका मुलगा मोटारसायकल घेऊन उभा होता. त्या तिघांनी त्या महिलेला पलासदारीच्या जंगल परिसरातील नेऊन बलात्कार केला. यादरम्यान पीडितेचा पती केळवली स्थानकावर उतरला आणि झालेला प्रकार वकील राजेंद्र येरुणकर यांच्या कानावर घातला. त्यांनी कर्जत पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर तानवडे यांनी चार पथकं तयार करून अवघ्या दीड तासात आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली.






























































