
सामना ऑनलाईन । मुंबई
सीएसएमटीजवळच्या हिमालय पूल दुर्घटनेबाबत पूल विभागातील अभियंत्याचे निलंबन आणि अटकेच्या निषेधार्थ 15 मेपासून सुरू होणारे पालिका अभियंत्यांचे तीनदिवसीय आंदोलन पालिका आयुक्तांच्या सकारात्मक भूमिकेमुळे मागे घेण्यात आले. मुंबई महानगरपालिका अभियंता संयुक्त कृती समितीने 13 मेपासूनच हे आंदोलन आझाद मैदानात सुरू केले होते. बुधवारपासून होणाऱ्या आंदोलनात मुंबईतील सर्व अभियंते सहभागी होणार होते.
हिमालय पूल दुर्घटना 14 मार्चला संध्याकाळी झाली. यात 7 पादचाऱ्यांचा बळी गेला तर 31 जण जखमी झाले होते. याची तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दक्षता विभागाला 24 तासांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या अहवालावरून पोलिसांनी पालिकेचे सह्यायक अभियंते एस. एफ. काकुळते यांना अटक केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता ए. आर.पाटील व गेल्या आठवडय़ात निवृत्त मुख्य अभियंते शीतलाप्रसाद कोरी यांना अटक करण्यात आली.
यासंदर्भात अभियंत्यांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले होते. सोमवारी त्यांनी केवळ कार्यालयातच बसून काम करायचे आणि साईटवर जायचे नाही असे असे एकदिवसीय असहकार आंदोलन केले. 15 मेपासून तीनदिवसीय आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात अभियंत्यांच्या शिष्टमंडळाने नवे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी भेट घेतली.
अभियंत्यांवर कामाचा ताण
आयुक्तांनी अभियंत्यांचे प्रश्न समजून घेतले आणि प्रशासनाच्या चौकशीनंतर पोलीस कारवाई करता येईल का, याची आपण बारकाईने चौकशी करू, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर 15 जूननंतर पालिकेतील 8 ते 15 अभियंत्यांना आयआयटीमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवू, सध्या पालिकेत 4200 अभियंते असून त्यांची संख्या कमी असल्याने इतर अभियंत्यांवर कामाचा ताण पडतो. किमान 1 हजाराच्यावर अभियंत्यांची भरती करणे आवश्यक आहे, ही बाब आयुक्तांनी मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

























































