Master शेफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शेफ विष्णू मनोहर

महाराष्ट्राची किचन क्वीन शेफ प्राजक्ता शहापूरकर. पूर्वी केवळ पुरुषांची मत्तेदारी असलेली शेफ उपाधी जेव्हापासून महिलांच्या नावामागे लागू लागली तेव्हा ‘शेफ’ हा शब्द खऱया अर्थाने उजळून निघाला.

आतापर्यंत मी या सदराखाली विविध लेखक, कवी, दिग्दर्शक, कलाकार मंडळींबरोबर जेवलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या. यावेळी मात्र माझ्याच क्षेत्रातील माझ्यासमोर मोठी झालेली व्यक्ती आपल्याबरोबर आहे प्राजक्ता पै शहापूरकर. ही मूळची कोल्हापूरची. मेजवानी किचन क्वीनच्या निमित्ताने ती स्पर्धेत भाग घ्यायला कोल्हापूर सेंटरवर आली होती. व तिने खडतर कठीण अशा दहा स्पर्धा पार पाडून महाराष्ट्रातील 50 हजार स्पर्धकांमधून अव्वल येत शेवटी मेजवानी महाराष्ट्राची किचन क्वीन हा किताब जिंकला. बऱयाच स्पर्धांमध्ये जज म्हणून काम करता करता तिने जी.एस.बी. खाद्यसंस्कृतीवर पुस्तकसुद्धा लिहीले. या पुस्तकाला कोल्हापूरला ऍवॉर्डसुद्धा प्राप्त झालेला आहे. ही व्यक्ती तिथेच थांबली नाही तर त्यांनी क्वीन्स किचन नावाचे स्वतःचे रेस्टॉरेंटसुद्धा बेळगावला सुरू केले.

ज्यावेळी तिला म्हटलं की, ‘डिनर डेट विथ सेलिब्रेटी शेफ प्राजक्ता’ हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे तर कुठल्या रेस्टॉरेंटमध्ये जायला आवडेल’ तर तिने सरळ म्हटलं, ‘तुमच्या बरोबर रेसिपी शेअर करता करता तुमच्याच स्टुडिओमध्ये आपण गप्पा मारू. मग आम्ही शूटिंग करत मधे मधे खात गप्पांना सुरुवात केली. प्राजक्ताच्या वडिलांचा दुधाचा व्यवसाय. त्यांनी स्वतःची डेअरी उभी केली. आज त्या डेअरीचं स्फुर्ती उद्योग समुहात रूपांतर झालं. यामध्ये आता हजारो लिटर दुधाचा चक्का, श्रीखंड, फ्लेवर्ड मिल्क, फ्लेवर्ड श्रीखंड, गुलाबजाम इत्यादी मिल्क प्रोडक्टस् तयार होतात. पूर्वीपासूनच मेहनतीची सवय असल्यामुळे सतत काहीतरी नवीन करावं याचा प्राजक्ताला ध्यास होता. मेजवानीच्या फायनलला विठ्ठल कामतांसमोर जेव्हा पदार्थ करायची त्यांची वेळ आली तेव्हा सगळे दडपणाखाली होते. पण प्राजक्ता मात्र शांत होती. यावर ती म्हणाली, ‘माझ्या कौशल्याच्या जोरावर मी इथपर्यंत आले. यापुढे काय करायचे आहे ते मी ठरवले आहे आणि ते मी मनापासून करेन.’ एवढा आत्मविश्वास जेव्हा मला तिच्यात दिसला त्यावेळी माझ्या लक्षात आले की, भावी किचन क्वीन अशीच असावी. तिने पारंपरिक जेएसबी खाद्यपदार्थांना नवीन कल्पकतेची साथ देऊन एक आगळावेगळा पदार्थ जगासमोर आणला आणि ती किचन क्वीन झाली.

एवढे सगळे पदार्थ तुम्ही लोकांसाठी बनविता तर तुम्हाला स्वतःला काय आवडतं यावर त्या म्हणाल्या की, नॉनव्हेज त्यांना प्रिय आहे. त्याचबरोबर कॉन्टीनेंटल पदार्थसुद्धा बऱयापैकी आवडतात. आता त्यांचं काम एवढं वाढलं आहे की, क्रिकेट वर्ल्डकपसाठी जाणाऱया टीमच्या फूड एक्स्पर्ट टीममध्ये त्यांचेसुद्धा नाव देण्यात आले आहे. यापुढे काय असं विचारल्यावर त्या म्हणाल्यात की, मला राजकारणात रस आहे. मी सतत सगळय़ा पुढाऱयांचा अभ्यास करत असते. आता स्पेशल चाईल्डला हाताशी घेऊन काहीतरी त्या मुलांना अर्थाजन होईल असं काम करणार आहे. तेवढय़ात आमच्या डायरेक्टरनी पुढची रेसिपी करायला तयार व्हा! असं फर्मान सोडलं आणि आमच्या गप्पा संपल्या.